प्रवीण पवार यांचे आई-वडील हे ऊसतोड कामगार असून उदरनिर्वाहासाठी दरवर्षी ऊस तोडीसाठी स्थलांतर करतात. अशा परिस्थितीत घरची जबाबदारी, शिक्षण आणि शेती यांचा समतोल साधत प्रवीणने शेतीकडे शास्त्रीय दृष्टीने पाहण्यास सुरुवात केली. आर्थिक अडचणी असूनही शिक्षण अर्धवट न सोडता, मिळणाऱ्या कृषी ज्ञानाचा प्रत्यक्ष शेतीत उपयोग करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. त्यातूनच कांदा लागवडीचा हा यशस्वी प्रयोग आकाराला आला.
advertisement
आवक वाढली, दर कोसळले; झेंडू शेतकऱ्यांचा संघर्ष वाढला, खर्चही निघणे झाले कठीण
कांदा पिकाच्या निवडीपासून ते लागवड, खत व्यवस्थापन, पाणी नियोजन आणि कीड-रोग नियंत्रणापर्यंत प्रत्येक टप्प्यावर प्रवीण पवार यांनी शास्त्रीय पद्धतीचा अवलंब केला. सुधारित वाणांची निवड, योग्य अंतरावर लागवड, ठिबक सिंचनाचा वापर आणि बाजारभावाचा अभ्यास करून विक्रीची योग्य वेळ साधल्यामुळे उत्पादन खर्च कमी झाला आणि नफा वाढला. कमी क्षेत्रात अधिक उत्पन्न कसे मिळवता येते, याचा आदर्श नमुना त्यांनी उभा केला आहे.
शिक्षण घेत असतानाच घरचा कारभार सांभाळणे हे सोपे काम नसते. मात्र प्रवीण पवार यांनी हे आव्हान स्वीकारले. आई-वडील ऊसतोडीसाठी बाहेर असताना घरची जबाबदारी, शेतीची कामे आणि अभ्यास यांचा ताळमेळ साधत त्यांनी सातत्य ठेवले. कठोर परिश्रम, वेळेचे नियोजन आणि सकारात्मक दृष्टिकोन यामुळेच हे यश मिळाल्याचे ते सांगतात.
जिद्द, मेहनत आणि चिकाटी असेल तर कोणतीही अडचण आड येत नाही. शेतीकडे व्यवसाय म्हणून पाहिले, तर ग्रामीण भागातील तरुणांना रोजगारासाठी स्थलांतर करावे लागणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. त्यांच्या या यशस्वी प्रयोगामुळे परिसरातील अनेक तरुण शेतीकडे नव्या दृष्टीने पाहू लागले असून प्रवीण पवार आज ग्रामीण तरुणांसाठी प्रेरणास्थान ठरत आहेत.





