सांगली : सांगलीच्या वाळवा तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात उसाचे उत्पादन घेतले जाते. मुबलक पाणी असल्याने इथले शेतकरी बागायती आणि आधुनिक शेतीवर भर देतात. यातच वाळवा तालुक्यातील कासेगावचे प्रगतशील शेतकरी उदय पाटील हे गेल्या पाच वर्षांपासून पेरुचे उत्पादन घेत आहेत. दीड एकर पेरू बागेचे योग्य व्यवस्थापन करत ते वर्षाकाठी 20 लाखांचा नफा मिळवत आहेत.
advertisement
कधी पासून करतात शेती?
उदय पाटील हे 2000 सालापासून शेती करत आहेत. भाऊ आणि कुटुंबाच्या मदतीने ते शेतीत नेहमीच नव-नवीन पिकांचा प्रयोग करत असतात. आधुनिक शेतीकडे त्यांचा पहिल्यापासूनच कल होता. पीक प्रयोगातून त्यांनी 2018 साली पेरूची लागवड केली आहे. दीड एकरामध्ये त्यांनी VNR थायलंड जातीच्या पेरूची बाग फुलविली आहे.
पानगळ होईल अन् झाड वाळून जाईल; पेरूच्या बागेची लगेच घ्या काळजी, धोकादायक रोगावर उपाय
लागवड केल्यापासून 18 महिने पेरूच्या झाडांची योग्य ती काळजी घेतली. सोबतच पेरूमध्ये त्यांनी शेवंती सारखे अंतर पीक घेऊन उत्तम नफा कमवला आहे. 18 महिन्यानंतर पेरूचा पहिला भार धरला होता. पहिल्याच भारातच त्यांना पंधरा टनाचे पेरूचे उत्पादन मिळाले. पेरू पिकाचा हा यशस्वी प्रयोग त्यांनी पुढे चालूच ठेवला. याच पेरूच्या बागेचे योग्य व्यवस्थापन करत ते वर्षातून दोन भार पकडतात. या दोन भारातून त्यांना सरासरी 35 टनांचे उत्पादन मिळते. फळाची कॉलिटी उत्तम असल्याने उत्पादित पेरू निर्यात होत असल्याचे उदय पाटील यांनी लोकल 18 शी बोलताना सांगितले.
उदय पाटील यांनी पेरू पिकात चांगला अभ्यास केला आहे. ते एका झाडाला 25-30 फळांचे उत्पादन घेतात. मोजकी फळे पण उत्तम क्वालिटी तयार करतात. एका फळाचे जवळपास एक किलो वजन भरते. फळाची कॉलिटी उत्तम असल्याने व्यापारी शेताच्या बांधावरूनच खरेदी करतात. सरासरी 60 ते 65 रुपये प्रतिकिलो या भावाने पेरूची विक्री होते. यातून ते वर्षाकाठी 20 लाखांचे उत्पन्न मिळवत आहेत. पारंपारिक ऊस लागवडीला फाटा देवून उदय पाटील यांनी पेरू लागवडीचा प्रयोग यशस्वी केला आहे.





