सांगली : शासनाच्या बचत गट प्रकल्पाच्या माध्यमातून अनेक महिलांना आर्थिक पाठबळ मिळाले आहे. बचत गटाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील अनेक महिलांना प्रोत्साहन मिळत आहे. शासनाच्या उमेद अभियानातून तासगाव तालुक्यातील येळावी गावच्या सारिका सुनील व्हनमाने उद्योजिका बनलेल्या आहेत. बचत गटाच्या माध्यमातून बेदाणा विक्रीचा व्यवसाय करत सारिका यांनी येळावी-तासगावचा बेदाणा ब्राझीलपर्यंत पोहोचवला आहे. उद्योजिका सारिका यांची यशोगाथा अनेक महिलांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
advertisement
व्यापाऱ्यांपेक्षा देतात जादा दर
द्राक्ष पट्ट्यात बदललेले वातावरण, शेतकऱ्यांची व्यापाऱ्यांकडून होणारी फसवणूक, रोगराई आणि वाढलेला खर्च यामुळे द्राक्ष शेती धोक्यात आली आहे. द्राक्ष चांगली पिकवली, तरी व्यापारी चांगला दर देईल याची आशा नाही. यामुळे अनेक शेतकरी नुकसान सोसत आहेत. मात्र, तासगाव तालुक्यातील येळावी येथील सारिका सुनील व्हनमाने या शेतकरी महिलेला शासनाच्या उमेद अभियानाची माहिती मिळाली. ग्रामीण भागात राहत असलेल्या गरजू महिलांना देखील स्वतःचा उद्योग व्यवसाय सुरू करता येत असल्याचे त्यांना समजले. उमेद अभियानाअंतर्गत स्वतःचा व्यवसाय सुरू करून त्यांनी व्यापाऱ्यांपेक्षा चढा दराने शेतकऱ्यांकडून बेदाणा खरेदी करत आहेत. यामुळे येळावी आणि परिसरातील शेतकऱ्यांकडून समाधान व्यक्त होत आहे.
2 गुंठ्यात व्यवसायाची उभारणी, शेतीला जोडधंदा म्हणून सुरु केले गावरान कोंबडी पालन, आता लाखोंची कमाई
वर्षाला सहा-सात टन बेदाण्याची करतात विक्री
स्वतःची अडीच एकर शेती असलेल्या या शेतकरी महिलेने आपल्या भागात बेदाण्याचे सगळ्यात जास्त उत्पादन होत असल्याचे लक्षात घेतले. आणि स्वतःच्या शेतातून तयार होणारा बेदाणा स्वतः विक्री करण्याचा निर्णय घेतला. 2013 मध्ये त्यांनी बेदाणा विक्रीस सुरुवात केली. कोल्हापूर एमआयडीसीमध्ये जाऊन त्यांनी पाच किलो बेदाणा विकला होता. पुढे येळावी गावामध्ये बचत गटाची स्थापना करून 2020 पासून त्या उमेद अभियानाशी जोडल्या गेल्या. तेव्हापासून त्या उमेद अभियानाच्या मार्गदर्शनाखाली बेदाणा विक्री करत आहेत. जिजाई स्वयंसहाय्यता बचत गट या नावाने त्यांनी बचत गटाची निर्मिती करून दहा वर्षांपूर्वी बेदाणा पॅकिंग करून विक्री करण्यास सुरुवात केली होती. पाच किलोपासून सुरू केलेला हा व्यवसाय त्यांनी मेहनतीने वाढवला असून सध्या वर्षाला सहा ते सात टन बेदाणा विक्री करत असल्याचे त्यांनी सांगितले. बेदाण्याच्या व्यवसायातून उद्योजिका सारिका वर्षाकाठी 13 लाखांची उलाढाल करत आहेत.
तासगावचा बेदाणा ब्राझीलपर्यंत पोहोचवला
सारिका आता 250 ग्रॅमपासून एक हजार किलोपर्यंतचा बेदाणा पॅकिंग करून तो माल जम्मू-काश्मीर, ओडिशा, पंजाब, आंध्र प्रदेश, मुंबई, नागपूर असा देशाच्या कानाकोपऱ्यात पाठवतात. नागपूर येथे झालेल्या उमेद अभियानांतर्गत महिलांच्या मालाच्या प्रदर्शनावेळी त्यांचा बेदाणा नागपूर येथून थेट ब्राझील येथील एका व्यापाऱ्याने खरेदी केला.
कुटुंबाची भक्कम साथ
येळावीसारख्या ग्रामीण भागात राहणाऱ्या सारिका यांना सुरुवातीला अनेक अडचणींचा सामना करावा लागला. मात्र त्यावर मात करून त्या आज उद्योजक बनलेल्या आहेत. एक सामान्य महिला शेतकरी ते परदेशामध्ये बेदाणा विक्री करणारी उद्योजिका बनताना त्यांना पती, बहीण, भाऊ यांची भक्कम साथ मिळाल्याचे त्यांनी सांगितले.