छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील मुरमा येथील शेतकरी शाईनाथ फटांगडे यांनी 2010 साली सहा एकर मोसंबीच्या झाडांची लागवड केली होती. परंतु, मागील दोन वर्षांपासून मोसंबीला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी हतबल झाल्याचे पाहायला मिळत आहे. लहान लेकराच्या तळहाताप्रमाणे जपलेल्या मोसंबीवरती आज शेतकऱ्यांना भाव न मिळाल्याने तोडण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. या शेतकऱ्याने 1000 मोसंबीच्या झाडांवरती जेसीबी फिरवली आहे, तरी शासनाने मोसंबीला हमीभाव जाहीर करावा आणि व्यापाऱ्यांकडून होणाऱ्या लुटीवर अंकुश लावावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
advertisement
या मोसंबीच्या बागेला मला दरवर्षी तीन ते साडेतीन लाख रुपये एवढा खर्च येतो पण एवढा खर्च करून देखील मोसंबीला भाव मिळत नाही म्हणजे जेवढा खर्च केला आहे तेवढा खर्च देखील यातून निघत नाही आहे. त्यामुळे आता करायचं तरी काय असा प्रश्न होता म्हणून मी माझ्या या सर्व मोसंबीच्या बागेवरती जेसीबी फिरवली आहे. स्वतःच्या लेकराप्रमाणे या झाडांना मी जपलं होतं पण आता काही इलाज नसल्यामुळे मला हे करावं लागत आहे, असे शेतकरी शाईनाथ फटांगडे म्हणाले आहेत. आमच्या पिकाला योग्य तो भाव द्यावा, अशी देखील त्यांनी मागणी केलेली आहे.





