आई माझ्याजवळच राहा त्रास होतोय, ऑपरेशन थिएटरमध्ये नेताना ऋषिकेशचं आर्जव, अन् काही तासांत घडलं धक्कादायक
- Reported by:Apurva Pradip Talnikar
- Published by:Mohan Najan
Last Updated:
आईच्या डोळ्यात अश्रू आणि मुलाच्या चेहऱ्यावर काही होणार नाही अशी हलकीशी आशा. पण नशीब काही वेगळंच ठरवून बसलेलं होतं.
छत्रपती संभाजीनगर : आई माझ्याजवळच राहा त्रास होतोय फक्त एवढंच सांगत ऋषिकेश ऊर्फ अजय अनिल गव्हाणे (24) ऑपरेशन थिएटरमध्ये गेला. आईच्या डोळ्यात अश्रू, आणि मुलाच्या चेहऱ्यावर काही होणार नाही अशी हलकीशी आशा. पण नशीब काही वेगळंच ठरवून बसलेलं होतं. काही तासांत ऋषिकेशची प्रकृती बिघडली आणि मंगळवारी सकाळी डॉक्टरांनी आईसमोरच एकाच धक्क्यात सांगितले तो नाही…एकुलत्या एका मुलाच्या मृत्यूची बातमी ऐकताच कुटुंबीयांचे हृदय कोसळले. त्या दुःखातून उठलेल्या वेदना संतापात बदलल्या… आणि रामनगर रोडवरील रुग्णालयापासून सिडको चौकातील खासगी रुग्णालयापर्यंत नातेवाइकांनी ठिय्या आंदोलन सुरू केले. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळेच ऋषिकेशचा मृत्यू झाला, असा त्यांचा आरोप होता.
मूळ जयभवानीनगर, मुकुंदवाडीतील रहिवासी ऋषिकेश आईसह जालन्यात स्थायिक असून स्कूलबसवर चालक होता. काही वर्षांपूर्वी त्याच्या वडिलांचे निधन झाले असून, आईला तो एकुलता एक मुलगा होता. शनिवारी ऋषिकेश कामानिमित्त बसने शहरात आला होता. सायंकाळी मित्रांसह तो दुचाकीने खुलताबादला गेला.
advertisement
तेथून फुलंब्रीमार्गे शहरात येताना, फुलंब्रीजवळ दुचाकीचा अपघात झाला. यात ऋषिकेशच्या उजव्या पायाला गंभीर इजा झाली. त्यानंतर त्याला तत्काळ रामनगर रोडवरील रुग्णालयात दाखल केले. रविवारी दुपारी त्याच्यावर शस्त्रक्रिया पार पडली. मात्र, याचदरम्यान त्याची प्रकृती अचानक चिंताजनक झाली. त्याला तत्काळ सिडको चौकातील एका खासगी रुग्णालयात हलवण्यात आले.
रामनगरमधील रुग्णालयात दाखल करेपर्यंत ऋषिकेश पायाच्या वेदना सोडून तो व्यवस्थित होता. गुडघ्याच्या शस्त्रक्रियेसाठी अत्यावश्यक काही टेस्ट करतानाही ऋषिकेश स्वतः बोलत होता. मात्र, शस्त्रक्रियेदरम्यान त्याची प्रकृती बिघडली. तेथील डॉक्टरांनी अचानक त्याला उपचारासाठी इतर ठिकाणी हलवण्याचा निर्णय घेतला. पण कुटुंबाची परवानगीच घेतली नाही. रविवारी सायंकाळी सिडको चौकातील रुग्णालयात दाखल केले. तेव्हापासून तो बेशुद्ध होताच. रामनगरच्याच डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे त्याचा मृत्यू झाल्याचा कुटुंबाचा आरोप होता.
advertisement
रुग्णालयात ऋषिकेशवर उपचार सुरू झाले. मात्र, सोमवारी मध्यरात्री प्रकृती चिंताजनक होऊन त्याचा मृत्यू झाला. रामनगरच्या डॉक्टरांनी शस्त्रक्रियेदरम्यान केलेल्या हलगर्जीपणामुळेच त्याचा मृत्यू झाला. प्रकृती चिंताजनक असतानाही दुसऱ्या रुग्णालयात हलवून त्याला चोवीस तासांनंतर मृत घोषित केल्याने त्याचे कुटुंब संतप्त झाले. मंगळवारी सकाळी नातलगांसह मित्रांची गर्दी जमा झाली. दोन्ही रुग्णालयांतील डॉक्टरांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. तणाव वाढल्याने पोलिस अधिकारी रुग्णालयात दाखल झाले होते.
advertisement
Location :
Aurangabad [Aurangabad],Aurangabad,Maharashtra
First Published :
Nov 19, 2025 10:07 AM IST
मराठी बातम्या/छ. संभाजीनगर/
आई माझ्याजवळच राहा त्रास होतोय, ऑपरेशन थिएटरमध्ये नेताना ऋषिकेशचं आर्जव, अन् काही तासांत घडलं धक्कादायक







