पारंपरिक पद्धतीने शेती न करता सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील वाफळे गावातील शेतकरी दिगंबर चव्हाण यांनी एका एकरात ड्रॅगन फ्रूटची शेती केली आहे. जून 2023 रोजी दिगंबर यांनी या ड्रॅगन फ्रूटची लागवड केली होती. एका एकरात 200 पोलवर ड्रॅगन फ्रूटची लागवड केली आहे. ड्रॅगन फ्रूटची लागवड करण्यासाठी दिगंबर चव्हाण यांना एक ते दोन लाख रुपयांचा खर्च आला आहे. तर ड्रॅगन फ्रूट विक्रीतून त्यांना सर्व खर्च वजा करून 6 ते 8 लाख रुपयांचे उत्पन्न मिळणार आहे.
advertisement
ड्रॅगन फ्रूटची विक्री दिगंबर चव्हाण हे आपल्या शेतातूनच करत आहेत. चव्हाण यांच्या शेतातील व्यापारी ड्रॅगन फ्रूट पाहून त्याची खरेदी करत आहेत. तर सोलापूरसह मुंबई, पुणे, कोल्हापूर या ठिकाणी असलेल्या बाजारात ते ड्रॅगन फ्रूट विक्रीसाठी पाठवत आहेत. सध्या मार्केटमध्ये सरासरी 60 ते 80 रुपये किलो भाव ड्रॅगन फ्रूटला मिळत आहे.
एकदा लागवड केलेल्या ड्रॅगन फ्रूटच्या शेतीतून शेतकरी दिगंबर चव्हाण यांना दहा ते बारा वर्षे उत्पन्न मिळणार आहे. शेतकरी आजही पारंपारिक पद्धतीने शेती करत आहेत, परंतु शेतकऱ्यांनी आधुनिक पद्धतीने जर शेती केली तर शेतीतून भरघोस असे उत्पन्न मिळेल असा सल्ला शेतकरी दिगंबर चव्हाण यांनी शेतकऱ्यांना दिला आहे. तर आजूबाजूच्या असलेल्या गावातील शेतकरी दिगंबर चव्हाण यांच्या ड्रॅगन शेतीला भेट देऊन शेती संदर्भात अधिक माहिती चव्हाण यांच्याकडून जाणून घेत आहेत.





