विकास आघाव हे काही वर्षांपूर्वी बीड शहरात राहून एमपीएसारख्या स्पर्धा परीक्षांची तयारी करत होते. मात्र, शिक्षणासोबत उत्पन्नाचे कोणतेही साधन नव्हते. घरची पाच एकर जमीन डोंगराळ असल्याने पावसावर अवलंबून शेती करावी लागे. पारंपरिक पिकांमध्ये खर्च जास्त आणि नफा कमी असल्याने त्यांनी नव्या शेती पद्धतींचा अभ्यास सुरू केला. त्यातूनच रेशीम शेती हा स्थिर उत्पन्नाचा पर्याय असल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी हा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला.
advertisement
प्रारंभी त्यांनी कृषी विभागाकडून मार्गदर्शन घेतले आणि रेशीम शेतीसाठी आवश्यक साधनसामग्री व झाडांची लागवड केली. पहिल्याच वर्षी चांगले उत्पादन मिळाल्याने त्यांचा आत्मविश्वास वाढला. आज त्यांच्या एक एकर क्षेत्रामध्ये दरवर्षी चार चक्रांमध्ये रेशीम कीडपालन केले जाते. रेशीम कोष विक्रीद्वारे त्यांना चांगला नफा मिळतो, तर उरलेल्या किड्यांच्या उपउत्पादनांचाही उपयोग खत निर्मितीसाठी केला जातो.
विकास यांनी सांगितले की, “रेशीम शेतीसाठी सुरुवातीला थोडा खर्च येतो, पण नंतर ती सातत्याने नफा देणारी शेती ठरते. पारंपरिक पिकांच्या तुलनेत या शेतीत मेहनत कमी आणि उत्पन्न जास्त आहे.” त्यांच्या या अनुभवामुळे परिसरातील अनेक तरुणांनीही रेशीम शेतीबाबत उत्सुकता दाखवली आहे.
आज विकास आघाव यांनी स्वतःच्या प्रयत्नांवर आणि सरकारी योजनांच्या मदतीने स्वावलंबनाचा मार्ग निवडला आहे. त्यांच्या या यशस्वी प्रयोगामुळे गावंदरा परिसरातील शेतकऱ्यांसमोर एक नवा पर्याय उभा राहिला आहे. रेशीम शेतीच्या माध्यमातून कमी क्षेत्रात अधिक उत्पन्न मिळवून त्यांनी दाखवून दिले की, नाविन्यपूर्ण शेती पद्धतीतून ग्रामीण भागातही समृद्धी साध्य करता येते.