सेंद्रिय उपायांमध्ये नीम तेलाचा स्प्रे हा सर्वात लोकप्रिय आणि विश्वसनीय पर्याय मानला जातो. नीमाच्या बियांपासून तयार होणारे हे तेल 150 हून अधिक किडींवर प्रभावी असून पांढरी माशी, अळी, थ्रिप्स, माइट्स यांसारख्या प्रमुख किडींवर नियंत्रण मिळविण्यात मदत करते. 5 मिली नीम तेल 1 लिटर पाण्यात मिसळून फवारणी केल्यास परिणाम लवकर दिसतो. यासोबतच लसूण-तंबाखू अर्क, मिरची-लसूण द्रावण, तसेच डॅशिंग वॉटर स्प्रे हेही स्वस्त आणि प्रभावी ऑर्गॅनिक स्प्रे म्हणून लोकप्रिय ठरत आहेत.
advertisement
किड नियंत्रणासाठी ट्रॅप आणि बायोकंट्रोल तंत्राचाही वापर वाढला आहे. फेरोमोन ट्रॅपच्या मदतीने नर किडे आकर्षित करून त्यांचे प्रजनन थांबवण्याचे काम होते, तर स्टिकी ट्रॅपमुळे पिकांवरील उडत्या किडींवर नियंत्रण मिळते. याशिवाय, उपयुक्त कीटक जसे की ट्रायकोग्रामा, लेडीबर्ड बीटल आणि ग्रीन लेसविंग यांच्या साहाय्याने किडांची संख्या नैसर्गिकरीत्या कमी केली जाते. हे कीटक पिकांसाठी हानिकारक नसून किडांवरच हल्ला करतात.
शेतात नैसर्गिक मल्चिंग, इंटरक्रॉपिंग आणि संधारणात्मक शेती पद्धती वापरल्यास किडांचा प्रादुर्भाव मर्यादित राहतो, असे तज्ज्ञ सांगतात. जमिनीतील आर्द्रता टिकवून ठेवणे, परस्परपूरक पिके लावणे आणि शेतीच्या जैवविविधतेत वाढ करणे यामुळे किडींना अनुकूल वातावरण मिळत नाही. परिणामी पिकांची रोगप्रतिकारक क्षमता वाढते आणि किडनाशकांवरील अवलंबित्व कमी होते.
तज्ज्ञांचे मत आहे की हे सर्व उपाय रासायनिक कीटकनाशकांपेक्षा सुरक्षित आणि पर्यावरणपूरक आहेत. नैसर्गिक उपायांचा वापर केल्याने उत्पादनाची गुणवत्ता वाढते, जमिनीची भौतिक रचना सुधारते आणि दीर्घकालीन शेती टिकावू बनते. त्यामुळे सेंद्रिय किड नियंत्रण पद्धतींकडे शेतकऱ्यांचा कल वाढत असून भविष्यात याचा अधिक व्यापक स्वीकार होईल, असा अंदाज तज्ज्ञ वर्तवितात.





