काढणी सुरू, पण उत्पन्न घटले
राज्यात काही भागांमध्ये सोयाबीनची काढणी सुरू झाली असून, काही ठिकाणी अजूनही उरलेले पीक शेतकरी हाताशी लावत आहेत. पण अतिवृष्टीमुळे उत्पादनात घट झाली आहे. बहुतांश ठिकाणी १० ते ३० टक्क्यांपर्यंत नुकसान झाल्याचे प्राथमिक अंदाज आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना उत्पादन खर्चही वसूल करणे कठीण झाले आहे.
भावात घट आणि अस्थिरता
advertisement
गेल्या काही वर्षांच्या तुलनेत या वर्षी सोयाबीनच्या दरात घट पाहायला मिळत आहे. मागील तीन वर्षांतील ऑक्टोबर महिन्यातील सरासरी दर पुढीलप्रमाणे होते.
ऑक्टोबर २०२२ : ५,०७१ रु प्रति क्विंटल
ऑक्टोबर २०२३ : ४,६६० रु प्रति क्विंटल
ऑक्टोबर २०२४ : ४,३६९ प्रति क्विंटल
या वर्षी, म्हणजे ऑक्टोबर २०२५ मध्ये सोयाबीनचे भाव ४,५१५ रु ते ४,८९५ रु प्रति क्विंटल इतके राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. बाजार समित्यांतील आवक आणि व्यापाऱ्यांचा कल पाहता दिवाळीपर्यंत मोठ्या वाढीची शक्यता नसल्याचे दिसते.
मागणी स्थिर
भारतातील सोयाबीन उत्पादनात या वर्षी सुमारे १३ टक्क्यांनी घट होणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. सन २०२५-२६ हंगामात देशात अंदाजे ११६ लाख टन उत्पादन अपेक्षित आहे. दरम्यान, किमान आधारभूत किंमत (MSP) ५,३२८ रु प्रति क्विंटल निश्चित करण्यात आली आहे. परंतु सध्या बाजारभाव हा MSP पेक्षा जवळपास १,००० रु ने कमी आहे.
दिवाळीनंतर दरात सुधारणा शक्य आहे का?
सोयाबीनचे प्रमुख उत्पादन राज्ये म्हणजे महाराष्ट्र, मध्य प्रदेश, राजस्थान आणि तेलंगणा या भागांमध्ये अजूनही काही ठिकाणी काढणी प्रलंबित आहे. काढणी पूर्ण झाल्यावर आणि साठा बाजारात आल्यावर दर काही काळ स्थिर राहतील, परंतु नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापासून थोडी सुधारणा होण्याची शक्यता आहे.