नाशिक: सध्याच्या काळात शिक्षण घेऊन नोकरीच्या शोधात अनेक तरुण असतात. पण नाशिकमधील एक 22 वर्षीय तरुण याला अपवाद ठरलाय. शुभम उत्तम अरिंगळे याच्या वडिलांचा पूर्वापार दुग्ध व्यवसाय आहे. कोरोनाच्या काळात लॉकडाऊनमध्ये सर्व व्यवहार ठप्प झाले. तेव्हा शुभम वडिलांना साथ देत दुग्ध व्यवसायात उतरला. आता त्याच्याकडे 200 जाफराबादी म्हशींचा गोठा असून यातून महिन्याला तब्बल 7 ते 8 लाख रुपयांची कमाई होतेय. एखाद्या आयटी मध्ये काम करणाऱ्या इंजिनिअरपेक्षा शुभमची कमाई जास्त असून युवा उद्योजक म्हणून त्याचा पंचक्रोशित लौकिक आहे.
advertisement
शुभमचे वडील उत्तम अरिंगळे हे पूर्वापार दुग्ध व्यवसाय करत आहेत. कोरोना काळात लॉकडाऊनमुळे सगळं ठप्प असताना शुभमचे कॉलेज देखील बंद होते. तेव्हा त्याने वडिलांना दुग्ध व्यवसायात मदत सुरू केली. पुढे याच व्यवसायात मन रमल्याने शिक्षणाला कायमचा पूर्णविराम दिला आणि म्हशींची संख्या वाढवण्याचा निर्णय घेतला. आता त्यांच्या गोठ्यात 200 जाफराबादी म्हशी आहेत. तसेच सध्या या व्यवसायातून 15 जणांना रोजगार देखील दिला आहे.
12 वी झाली अन् घेतली म्हैस! घरातूनच करतोय लाखात कमाई, शेतकऱ्याच्या पोराचा नादच खुळा!
रोज 1200 लिटर दूध विक्री
कोरोना काळात दूध काढण्यासाठी कामगार नव्हते. ही समस्या पुन्हा निर्माण व्हायला नको म्हणून शुभमने म्हशींचा गोठा अत्याधुनिक पद्धतीचा बनवला आहे. आता यांत्रिक पद्धतीनं म्हशींचं दूध काढलं जातं. 200 म्हशींच्या गोठ्यातून दिवसाला 1 हजार ते 1200 लिटर दुधाची विक्री केली जाते. विशेष म्हणजे दुधाची संपूर्ण विक्री ते स्वत: करतात. त्यामुळे दुधाला प्रति लिटर 76 रुपयांपर्यंत दर मिळत आहे. त्यामुळे महिन्याला 7 ते 8 लाख रुपयांपर्यंत उत्पन्न मिळत असल्याचे शुभम सांगतो.
युवा पिढीपुढे आदर्श
महाविद्यालयीन वयात काही तरुण व्यसनाच्या आहारी जात चैन आणि विलासी जीवन जगतात. परंतु, शुभम हा याच काळात नोकरीच्या मागे न लागता परंपरागत व्यवसायाला आधुनिकतेची जोड देत लाखोंची कमाई करतोय. त्याचा हा प्रवास अनेक तरुणांसाठी प्रेरणादायी ठरणारा आहे.