दादाची शाळा ही केवळ शाळा नसून रस्त्यावरच्या मुलांसाठी जीवन बदलवणारा एक उपक्रम आहे. पुण्यातील सिग्नल, वस्त्या, झोपडपट्ट्या आणि फुटपाथवर राहणाऱ्या मुलांना गुरुवार ते रविवार नियमित शिक्षण देण्याचे काम 150 हून अधिक स्वयंसेवक करत आहेत. या शाळेत 8 ते 18 वयोगटातील मुलं शिकतात. विशेष म्हणजे, इथल्या काही विद्यार्थ्यांनी दहावी, बारावीची परीक्षा यशस्वीरीत्या पूर्ण केली असून एक मुलगी उच्च शिक्षणही घेत आहे.
advertisement
अभिजित पोखरणीकर सांगतात, आम्हाला काहीतरी वेगळं करायचं होतं, पण काय हे ठरत नव्हतं. एक दिवस सिग्नलवर गाडी थांबली असताना रस्त्यावर भटकणारी मुलं पाहिली आणि त्यांना शिकवायचं ठरवलं. तिथूनच दादाची शाळाची सुरुवात झाली. आज या शाळेमुळे 1700 मुलं थेट शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आली आहेत.
सध्या कात्रज, पाषाण, पिरंगुट, आकुर्डी, बिजलीनगर, झेड ब्रिज आणि विश्रांतवाडी अशा भागांत दादाची शाळा कार्यरत आहे. प्रत्येक ठिकाणी स्वयंसेवक मुलांना फक्त अभ्यास शिकवत नाहीत, तर त्यांच्या डॉक्युमेंटेशनपासून ते सरकारी योजनांचा लाभ मिळवून देण्यापर्यंतची जबाबदारी घेतात. मुलांना शाळेत दाखल करून देणे, शैक्षणिक साहित्य पुरवणे अशी अनेक कामे संस्थेमार्फत केली जातात.
दादाची शाळामध्ये शिकणाऱ्या मुलांना सुरुवातीला खेळ, गाणी, चित्रकला या माध्यमांतून अभ्यासाची गोडी लावली जाते. हळूहळू या मुलांना नियमित शाळेत प्रवेश मिळवून देण्याचे प्रयत्न होतात. आता 272 शिकत आहेत. शिक्षणामुळे त्यांच्या जीवनात नवे स्वप्न रुजत आहेत.
या उपक्रमासाठी स्थानिक नागरिक आणि तरुणांचा मोठा हातभार लागत आहे. 150 स्वयंसेवक आठवड्याला काही तास काढून या मुलांना शिकवतात. कुणी गणित शिकवतो, कुणी इंग्रजी, तर कुणी चित्रकला. या स्वयंसेवकांच्या प्रयत्नामुळे दादाची शाळा ही फक्त शाळा न राहता एक चांगला उपक्रम बनला आहे.
आजवर 8 मुलींनी दहावी उत्तीर्ण केली, 2 मुलींनी बारावी पूर्ण केली आणि एका मुलीने उच्च शिक्षणाकडे पाऊल टाकले आहे. या यशकथा रस्त्यावरच्या इतर मुलांसाठी प्रेरणादायी ठरत आहेत. रस्त्यावरच्या प्रत्येक मुलाला शिक्षण देऊन त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणणे हेच आमचे उद्दिष्ट आहे, असे अभिजित पोखरणीकर सांगतात.