भगवान सदावर्ते हे मूळचे बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यामधील चिंचोली सांगळे गावाचे. त्यांचं पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण झालेलं आहे. पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी एमपीएससी स्पर्धा परीक्षा केली आणि त्यासोबतच आता ते सध्या लॉचे शिक्षण घेतात. भगवान सदावर्ते यांचे आई-वडील मोलमजुरीचे काम करून आपला उदारनिर्वाह करतात. भगवान सदावर्ते हे संभाजीनगर शहरामध्ये विना छताची शाळा चालवतात आणि अनेक असे जे मुलं शिक्षणापासून वंचित आहेत त्यांना शिक्षण देण्याचे ते काम करतात.
advertisement
लॉकडाऊनच्या दरम्यान भगवान सदावर्ते यांना काही मुलं ही ड्रग्स घेताना आढळली आणि त्यानंतर त्यांना असं वाटलं की या मुलांना जर आपण शिक्षणाच्या प्रवाहात आणलं, तर यांचं आयुष्य सुधरेल. म्हणून त्यांनी ठरवले की आपण या मुलांना शिक्षण देऊयात. सुरुवातीला जेव्हा भगवान सदावर्ते हे त्या मुलांच्या घरी गेले, त्या ठिकाणी गेल्यानंतर त्यांना अनेक गोष्टींचा सामना करावा लागला. सुरुवातीला मुलांच्या पालकांना असं वाटले की हा आपल्या मुलाला किडनॅप करेल किंवा हा कोणीतरी वेगळाच मुलगा आहे. त्यामुळे त्यांना त्या लोकांनी काही एक विचारलं नाही आणि त्यांची कुठलीच गोष्ट ऐकून घेतली नाही. त्यासोबतच त्यांना शिवीगाळ देखील केलेली आहे.
त्यानंतर भगवान यांनी त्या मुलांच्या घरी गेले, त्यांच्यासोबत जेवण केलं, त्यांच्या आई-वडिलांसोबत जेवण केलं, त्यांच्याशी चांगल्या गप्पा मारल्या. त्यानंतर हळूहळू त्यांच्या आई-वडिलांना यांच्यावरती विश्वास बसायला लागला आणि त्यांनी त्यांच्या वस्तीमध्ये जाऊन शाळा घ्यायला सुरुवात केली. आणि एका लिंबाच्या झाडाखाली त्यांनी सगळ्यात पहिले शाळा घ्यायला सुरुवात केली. त्या ठिकाणी त्यांनी एक पाटी लावली, त्यावर लिहिलं विना छताची शाळा.
छत्रपती संभाजीनगर शहरातील ते बाबा पेट्रोल पंपजवळ असणाऱ्या भाग्यनगर या ठिकाणी एक छोटीशी वस्ती आहे, त्या वस्तीमध्ये जाऊन ते मुलांना शिकवतात. त्याचबरोबर शहरातीलच वाळूज परिसरामध्ये जाऊन देखील ते मुलांना शिक्षण देतात. तसेच शहरातील हनुमान टेकडी परिसरामध्ये अनेक विविध भट्टी आहेत, त्या ठिकाणी देखील जाऊन ते मुलांना शिक्षण देतात, असं भगवान सदावर्ते सांगतात.
वाळूज परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात एमआयडीसी एरिया आहे आणि त्या ठिकाणी अनेक असे मुलं आहेत जे शाळेपासून आणि शिक्षणापासून वंचित आहेत, तर त्यांना ते शिकवण्याचं काम करतात. दररोज संध्याकाळी ते जातात, त्या मुलांना शिकवतात आणि त्यांचे भवितव्य घडवण्यासाठी मदत करतात. तसेच त्यांनी अनेक मुलांना शाळेमध्ये देखील प्रवेश मिळवून दिला आहे. त्यांना मुख्य प्रवाहात आणलं आहे. त्यासोबतच ते प्रत्येक मुलाला पाहिजे तशी मदत करतात.