शेख कलीम शेख सरदार (वय 35, रा. गल्ली नं. 3, रवींद्रनगर, शहाबाजार), अनिता अविनाश पाचोंदे (वय 20, रा. गल्ली नं. 2, रवींद्रनगर, शहाबाजार), अनिता पाचोंदेचा पती अविनाश पाचोंदे उर्फ आवड्या (रा. रवींद्रनगर) आणि शेख मुस्ताक शेख इसाक (रा. जिन्सी) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. तर शेख अशपाक पटेल, प्रवीण ठोंबरे उर्फ अजय, शेख सोहेल शेख सत्तार उर्फ कलीम, शोएब युनूस खान उर्फ लाला, दाऊद मुनावर खान पठाण, शेख हाफीज शेख सलीम, अबुजर जफर खान आणि श्रावण तांबे यांचा शोध पोलीस घेत आहेत.
advertisement
सहायक पोलीस निरीक्षक विनायक शेळके यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती की, शेख कलीम शेख सरदार आणि शेख अशपाक पटेल यांनी शहाबाजार येथील रवींद्रनगरातील घरात एम.डी. ड्रग्ज आणि नशेची औषधे लपवून ठेवली असून, ते हा माल साथीदारांच्या मदतीने हलवण्याच्या तयारीत आहेत.
पोलीस निरीक्षक गजानन कल्याणकर, सहायक पोलीस निरीक्षक विनायक शेळके आणि पोलीस उपनिरीक्षक प्रवीण वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने छाप्याचे नियोजन केले. दुपारी साडेतीनच्या सुमारास पथक शेख कलीमच्या घरासमोर पोहोचले. दरवाजा उघडताच शेख कलीमला ताब्यात घेऊन त्याच्याकडील मोबाईल जप्त करण्यात आला. घराच्या खालच्या मजल्यावर तपास केला असता 10 बाय 12 आकाराच्या खोलीत शिलाई मशीन, वॉशिंग मशीन, टीव्ही आणि कपडे आढळून आले. त्यानंतर जिन्याने वरच्या मजल्यावरील खोलीची तपासणी करण्यात आली.
वरच्या 8 बाय 12 आकाराच्या खोलीतील लाकडी कपाटात रोख रक्कम, एम.डी. सदृश्य अंमली पदार्थ, सोने-चांदीचे दागिने आणि जुने वापरातील मोबाईल हॅण्डसेट आढळून आले. पोलिसांनी 53.32 ग्रॅम वजनाचा, 3 लाख 19 हजार 920 रुपयांचा एम.डी. ड्रग्ज साठा जप्त केला. याशिवाय 3 लाख 36 हजार 200 रुपये रोख रक्कम, 1 लाख 61 हजार 560 रुपयांचा सोन्याचा नेकलेस, 3 लाख 27 हजार 180 रुपयांचे मंगळसूत्र, 57 हजार 260 रुपयांचे सोन्याचे कानातील टॉप्स, 1 लाख 13 हजार 400 रुपयांचे मंगळसूत्र, 32 हजार 480 रुपयांचा सोन्याचा बदाम आकाराचा पत्ता तसेच चैन आणि वाळे असे चांदीचे दागिने जप्त करण्यात आले. यासोबतच 6 मोबाईलही ताब्यात घेण्यात आले. एकूण 15 लाख 7 हजार 634 रुपयांचा मुद्देमाल शेख कलीमच्या घरातून जप्त करण्यात आला.
शेख कलीमची चौकशी केली असता त्याने एम.डी. ड्रग्ज शेख अशपाक पटेल याच्याकडून घेतल्याची माहिती दिली. तसेच कोडेन सिरपचा साठा शेजारी राहणाऱ्या साथीदार अविनाश पाचोंदे याच्या घरी ठेवल्याचे सांगितले. त्यानुसार पोलिसांनी शेख कलीमला घेऊन पाचोंदेच्या घरावर छापा टाकला. अनिता पाचोंदेने दरवाजा उघडताच तिला ताब्यात घेण्यात आले आणि तिच्या घरातून 2 लाखांहून अधिक रुपयांचा कोडेन सिरपचा साठा जप्त करण्यात आला.
या संपूर्ण कारवाईत पोलीस निरीक्षक गजानन कल्याणकर, सहायक पोलीस निरीक्षक विनायक शेळके, पोलीस उपनिरीक्षक प्रवीण वाघ, सचिन शिंदे, राजेंद्र साळुंके, गुप्ता, नवसारे, विजय निकम, सुनील जाधव, दंडवते, अकोले, श्रीकांत काळे, राजेश यदमळ, मुगळे, सपकाळ, शेख शाहरूख, महिला पोलीस अंमलदार पारधी, इलग, पूजा भोसले आणि इंगळे यांनी सहभाग घेतला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रविकिरण कदम करत आहेत.






