18 डिसेंबर 2025 रोजी बर्दापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील जवळगाव शिवारात एका अज्ञात पुरुषाचा मृतदेह पालथ्या अवस्थेत आढळून आला होता. मृतदेहावर मारहाणीच्या खुणा दिसून आल्याने पोलिसांनी पंचनामा करून शवविच्छेदनासाठी पाठवला. शवविच्छेदन अहवालात मारहाणीमुळे मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर अज्ञात आरोपीविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.
तपासादरम्यान स्थानिक गुन्हे शाखेने सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल कॉल डिटेल्स आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे मृत व्यक्तीची ओळख स्वप्नील ऊर्फ चिंगू अशोक ओव्हाळ वय 30 रा. रेणापूर, जि. लातूर अशी पटवली. संशयाच्या आधारे नातेवाईक गोरोबा मधुकर डावरे याला ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आली असता, खुनामागील कट उघडकीस आला.
advertisement
Shocking Crime : धक्कादायक! त्या गोष्टीसाठी पती बनला हैवान,लोखंडी कुलपाने पत्नीच्या डोक्यावर वार
मुख्य आरोपी गोरोबा डावरे याने लातूर आणि नांदेड येथील तीन साथीदारांच्या मदतीने स्वप्नीलला रेणापूरहून जवळगाव येथे आणले. शिवारात नेऊन त्याला बेदम मारहाण करण्यात आली आणि गळा आवळून त्याची हत्या करण्यात आली. त्यानंतर मृतदेह शेतात फेकून देण्यात आला. या प्रकरणी गोरोबा मधुकर डावरे (वय 45), संतोष लिंबाजी मांदळे (34), किशोर गोरोबा सोनवणे (29) आणि अमोल विनायक चव्हाण (26) यांना अटक करण्यात आली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, मयत स्वप्नील हा मुख्य आरोपीचा साडूचा मुलगा होता. पालकांचे निधन झाल्यानंतर गोरोबानेच त्याचा सांभाळ केला होता तसेच त्याचे लग्नही लावून दिले होते. मात्र स्वप्नीलला दारूचे व्यसन असून तो दारू पिऊन पत्नी आणि नातेवाइकांना वारंवार त्रास देत होता. एकदा त्याने गोरोबाच्या अंगावर धावून जाण्याचा प्रकारही केला होता. या सततच्या त्रासाला कंटाळूनच खून करण्यात आल्याचे तपासात निष्पन्न झाले असून पुढील तपास सुरू आहे.






