मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गालगतच्या काशिमीरा पोलीस ठाणे हद्दीत असलेल्या ‘केम छो’ या ऑर्केस्ट्रा बारमधील अनैतिक कारवायांचे भयानक वास्तव बुधवारी ने उघडकीस आणले. या बातमीची दखल घेत पोलीस आणि पालिका प्रशासनाने तत्काळ कारवाई करत त्या बारमधील गुप्त दरवाजा, अरुंद बोळ आणि ‘कॅविटी रूम’ बुधवारीच उद्ध्वस्त केलं.
विशेष म्हणजे, अनैतिक मानवी वाहतूक कक्षाचे (भाईंदर विभाग) पोलीस निरीक्षक देविदास हंडोरे यांनी या बारवर सोमवारी कारवाई केली होती. पोलीस येताच वर्दी देणारा ‘अलार्म सिग्नल’, बारच्या मागील बाजूस असलेली गुप्त पळवाट आणि अन्य संशयास्पद ठिकाणांचा त्यांनी कारवाईत पर्दाफाश केला होता. परंतु, ही महत्त्वपूर्ण आणि धाडसी कारवाई करणाऱ्या देविदास हंडोरे यांची बुधवारीच तात्काळ बदली करण्यात आली, ही बाब आश्चर्यजनक ठरत आहे. बारवर कारवाई करणाऱ्या अधिकाऱ्यांवर अशी अन्यायकारक कारवाई केल्यामुळे पोलीस दलातील अधिकाऱ्यांमध्ये संभ्रमाची परिस्थिती निर्माण झाली आहे.
advertisement
मिरा भाईदरमध्ये 30 ते 40 बार
मिरा भाईदरमध्ये 30 ते 40 बार आहेत. या बारना रात्री दीड वाजेपर्यंत परवानगी आहे. पण हे बार वेळ संपल्यानंतरही पहाटे 4 वाजेपर्यंत सुरू आहेत. या बारमध्ये ऑर्केस्ट्रा सुरू नसतो. मात्र, बारबालांना गायिका असल्याचे दाखवतात. पण ही गाणी रेकोर्डेड असतात. रात्रीच्या सुमारास महिला आणि पुरुष मिळून फक्त 7 गायक-गायिका ठेवण्याची परवानगी असते. मात्र या ठिकाणी 15 ते 20 बारबाला असल्याची माहिती समोर आली आहे.
नवनियुक्त पोलीस आयुक्तांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह
‘केम छो’ बार काशिमीरा पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात असून, स्थानिक पोलीस ठाण्यानेच ही कारवाई करणे अपेक्षित होते. मात्र, त्यांनी कोणतीही ठोस कारवाई केली नसल्याचे समोर आले आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे स्थानिक पोलीस ठाण्यातील कुठल्याही जबाबदार अधिकाऱ्यावर कोणतीही शिस्तभंगाची कारवाई झालेली नाही. नुकतेच पदभार स्वीकारलेले मीरा-भाईंदर व वसई-विरार पोलीस आयुक्त निकेत कौशिक यांच्या कार्यशैलीवर यामुळे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ज्याने बारवर यशस्वीपणे कारवाई केली, त्याची बदली; आणि जे निष्क्रीय राहिले, त्यांच्यावर कोणतीही कारवाई नाही, या दुटप्पी धोरणामुळे पोलीस दलातील कार्यप्रणाली आणि नैतिकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत.