शेख हसीना यांनी बांगलादेशातून पलायन केल्यानंतर तेथील हिंसा, लुटमार आणि जाळपोळीच्या घटना होत आहेत. हसीना यांचे निकटवर्तीय फिल्म प्रोड्युसर सलीम खान आणि त्यांचा मुलगा शान्तो खान यांची संतप्त जमावाने हत्या केली आहे. बांगलादेशातील सिनेक्षेत्राला त्यामुळे मोठा धक्का बसला आहे. सलीम खान आणि शान्तो खान हे दुपारी घरी जात असताना फरक्काबाद बाजारात संतप्त जमावाच्या नजरेस पडले. त्यावेळी स्वतःकडील बंदुकीतून हवेत गोळी झाडून सलीम यांनी स्वसंरक्षणाचा प्रयत्न केला. मात्र, त्यानंतर जमावाने त्यांच्यावर हल्ला केला आणि त्या दोघांना बेदम मारहाण करून त्यांचा जीव घेतला.‘बांग्ला चलचित्र’ मार्फत सोशल मीडियावरुन या बाबत माहिती देण्यात आली आहे.
advertisement
( Pushpa 2 : एका हातात कुऱ्हाड, दुसरीकडे पिस्तुल; SP भंवर सिंह गुंडा लुक समोर )
भारतातील बंगाली सिनेमाशीही सलीम खान यांचा
संबंध होता. मुजीबुर रहमान यांच्या जीवनावरील एका प्रसिद्ध सिनेमाचे ते प्रोड्युसर होते. बॉलिवूडमधील एका मोठ्या फिल्मस्टारबरोबर त्यांनी ‘कमांडो’ नावाचा सिनेमा केला होता मात्र तो रिलीज झाला नाही. ‘टाइम्स ऑफ इंडिया’ च्या बातमीनुसार टॉलिवूडमध्ये सलीम खान यांचे 10 सिनेमे प्रसिद्ध होण्याच्या मार्गावर आहेत, त्यात अनेक मोठे स्टार्स काम करत होते.
सलीम आणि शान्तो खान हे शेख हसीना यांचे
निकटवर्तीय तर होतेच, मात्र त्यांच्यावर विविध केसेस दाखल आहेत. चांदपूर समुद्र सीमेवर पद्मा-मेघना नदीपात्रात अवैध रेती उत्खनन प्रकरणी त्यांना दोषी ठरवण्यात आलं होतं. सलीम या प्रकरणी तुरुंगातही जाऊन आले होते. भ्रष्टाचार निरोधक आयोगात शान्तो विरुद्ध खटले चालू होते. 3.25 कोटी रुपयांची अवैध संपत्ती जमवल्याप्रकरणी शान्तोवर खटला सुरु होता.
आरक्षणाच्या मुद्द्यावरुन बांगलादेशात हिंसाचाराला सुरुवात झाली. शेख हसीना यांचं सरकार पडलं. हसीना यांनी बांगलादेशातून पलायन केलं आणि त्या भारतात आश्रयाला आल्या. त्यानंतर आता नोबेल पुरस्कार विजेते मोहम्मद युनूस यांच्या हाती बांगलादेशची सूत्रं सोपवण्यात आली आहेत. मात्र, अद्यापही तेथील हिंसाचार कमी झालेला नाही.