DDLJ मधील गाणं ऐकून पंतप्रधान कीअर स्टार्मर झाले स्तब्ध
पंतप्रधान कीअर स्टार्मर यांचे YRF स्टुडिओमध्ये अत्यंत उत्साहात स्वागत करण्यात आले. यावेळी जेव्हा 'डीडीएलजे' मधील लोकप्रिय गाणं “तुझे देखा तो ये जाना सनम” हे गाणे वाजले, तेव्हा पंतप्रधान क्षणभर स्तब्ध झाले. बॉलिवूडच्या या जादूई संगीताच्या तालावर परदेशी पाहुणेही कसे मंत्रमुग्ध होतात, याचा अनुभव तिथे उपस्थित असलेल्या प्रत्येकाने घेतला. 'डीडीएलजे'च्या ३० व्या वर्षाच्या सेलिब्रेशनसाठी हा क्षण अधिकच खास ठरला.
advertisement
'डीडीएलजे'ने जोडले भारत-ब्रिटनचे नाते
यश राज फिल्म्स आणि ब्रिटनचे नाते खूप जुने आणि खास आहे. 'डीडीएलजे' या आयकॉनिक चित्रपटाचे बहुतांश शूटिंग लंडन आणि यूकेमधील इतर सुंदर ठिकाणी झाले आहे. या चित्रपटामुळे भारतीय सिनेमा आणि ब्रिटिश संस्कृतीला एकत्र जोडणारा एक भावनात्मक पूल तयार झाला, जो आजही कायम आहे.
आता या क्रिएटिव्ह सहकार्याला आणखी गती देण्यासाठी YRF ने मोठी घोषणा केली आहे. यश राज फिल्म्स लवकरच २०२६ पासून यूकेमध्ये तीन मोठ्या चित्रपटांचे चित्रीकरण सुरू करणार आहे. यामुळे भारत-ब्रिटनचे सांस्कृतिक आणि व्यावसायिक बंध आणखी मजबूत होतील, यात शंका नाही.
'DDLJ' चा इंग्रजी म्युझिकल अवतार
सध्या यश राज फिल्म्स 'डीडीएलजे' च्या कथेवर आधारित एका इंग्रजी संगीतनाट्य रूपांतरावर काम करत आहे. याचे नाव 'कम फॉल इन लव्ह: द डीडीएलजे म्युझिकल' असे आहे. हा एक 'ईस्ट मीट्स वेस्ट' साजरा करणारा सुंदर प्रवास आहे, जो प्रेम, एकता आणि संस्कृतींच्या मिलनाचा उत्सव आहे. 'डीडीएलजे'ची ही कथा आजही जगभरातील प्रेक्षकांच्या मनाला स्पर्श करत आहे, हेच पंतप्रधान कीअर स्टार्मर यांच्या प्रतिक्रियेतून दिसून आले.