यंदाच्या गणेशोत्सवात हृताच्या घरी दुहेरी आनंद आला आहे. ती आणि तिचा पती आणि प्रसिद्ध दिग्दर्शक प्रतीक शाह यांनी नवीन चमचमीत बीएमडब्ल्यू कार खरेदी केली आहे. निळ्या रंगाची ही आलिशान कार शाह कुटुंबाच्या आनंदात भर घालणारी ठरली आहे.
advertisement
प्रतीक शाहने कारसोबतचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत लिहिले, "गणेश चतुर्थीला बाप्पाने नवीन चाकांसह आशीर्वाद दिला. गणपती बाप्पा मोरया!" या फोटोंमध्ये प्रतीकसोबत हृता आणि त्याची आई मुग्धा शाहदेखील दिसत आहेत. या खास क्षणाला संपूर्ण कुटुंबाने एकत्र साजरा केला.
हृतानेही या पोस्टवर गोड प्रतिक्रिया दिली. तिने लिहिलं "तुझा खूप अभिमान वाटतो." तिच्या या शब्दांमधून पतीप्रतीचा आधार आणि प्रेम स्पष्ट दिसत आहे.सोशल मीडियावर प्रतीकच्या या पोस्टवर चाहत्यांसह सेलिब्रिटींनीही अभिनंदनाचा वर्षाव केला आहे. चाहत्यांनी "नव्या गाडीत गोड आठवणी तयार व्होत" अशा शुभेच्छा दिल्या आहेत.
दरम्यान, हृताने अभिनय क्षेत्रात पाऊल टाकलं ते ‘दुर्वा’ या मालिकेतून. त्यानंतर ‘फुलपाखरू’ मालिकेतून ती घराघरात पोहोचली. तिच्या निरागस अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली. त्यानंतर ‘मन उडू उडू झालं’ मालिकेतून हृता आणखी लोकप्रिय झाली. सिनेमांच्या बाबतीतही तिचा प्रवास यशस्वी ठरला आहे. ‘टाइमपास 3’, ‘अनन्या’, ‘सर्किट’, ‘कन्नी’ यांसारख्या चित्रपटांत ती झळकली आहे. याशिवाय हिंदी वेब सीरिज ‘कमांडर करण सक्सेना’ मध्येही हृताने काम केले आहे. आता तिचा नवीन चित्रपट ‘आरपार’ लवकरच प्रेक्षकांसमोर येणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत ललित प्रभाकर मुख्य भूमिकेत दिसणार आहे.