'पुन्हा शिवाजीराजे भोसले' या चित्रपटाचा ३ मिनिटे ३४ सेकंदांचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून, तो अक्षरशः अंगावर काटा आणणारा आहे. या ट्रेलरमधून आजवर कधीही न दिसलेले छत्रपती शिवाजी महाराजांचे प्रखर रूप पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे, हा चित्रपट फक्त इतिहासावर आधारित नाही, तर तो वर्तमान आणि इतिहास असा सुंदर संगम साधतो. यात मराठीची अस्मिता, बळीराजाच्या आत्महत्यांचा गंभीर प्रश्न, मुंबईतील मराठी माणसाचे स्थान, परप्रांतीयांची मुजोरी अशा अनेक ज्वलंत विषयांवर महाराजांचे भाष्य आणि कृती पाहायला मिळणार आहे.
advertisement
राज ठाकरेंकडून महेश मांजरेकरांवर स्तुतिसुमने
ट्रेलर लाँच सोहळ्यात राज ठाकरे यांनी दिग्दर्शक महेश मांजरेकर यांचे तोंडभरून कौतुक केले. राज ठाकरे म्हणाले, "महेश खरंच झपाटलेला माणूस आहे. तो जे पाहतो आणि करतो, ते भव्य असते."
महाराष्ट्राबद्दलच्या संवेदना जाग्या असल्याशिवाय असे चित्रपट बनू शकत नाहीत, असे मत त्यांनी व्यक्त केले. "शेतकरी आत्महत्येचा विषय अशा प्रकारे मांडणं, हे खूप मोठं धाडस आहे. हिंदी चित्रपटसृष्टीत यश चोप्रा आणि मराठीत महेश मांजरेकर यांचे स्थान निश्चित आहे." असे सांगत त्यांनी मांजरेकरांचे कौतुक केले. राज ठाकरेंनी खात्री व्यक्त केली की, हा चित्रपट महाराष्ट्र नक्कीच उचलून धरेल.
कलाकारांची तगडी फौज
'पुन्हा शिवाजीराजे भोसले' या चित्रपटात सिद्धार्थ बोडके छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुख्य भूमिकेत दिसणार आहे. त्याला विक्रम गायकवाड, शशांक शेंडे, मंगेश देसाई, पृथ्वीक प्रताप यांसारख्या कलाकारांची तगडी साथ मिळाली आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेते बाल कलाकार त्रिशा ठोसर आणि भार्गव जगताप यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. महेश मांजरेकर लिखित आणि दिग्दर्शित हा चित्रपट ३१ ऑक्टोबर रोजी महाराष्ट्रात प्रदर्शित होणार असून, बॉक्स ऑफिसवर तो काय कमाल करतो, याकडे प्रेक्षक आणि समीक्षकांचे लक्ष लागले आहे.