१४ ऑगस्ट रोजी संध्याकाळी ही घटना घडली. निर्माते कृष्णकुमार त्यांच्या 'चित्रलेखा हेरिटेज स्टुडिओ'मध्ये काही मित्र आणि कलाकारांसोबत बसले होते. त्यावेळी अचानक निकिता घाग आणि तिच्यासोबत १०-१२ अनोळखी लोक त्यांच्या ऑफिसमध्ये घुसले. त्यांनी सगळ्यांना शिवीगाळ करून बाहेर हाकलून लावलं.
निर्मात्यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यातील एका तरुणाने स्वतःची ओळख दादा अशी करून नाव विवेक जगताप असल्याचं सांगितलं. त्यानंतर निकिता आणि तिच्या साथीदारांनी कृष्णकुमार यांच्यावर खोटे आरोप केले आणि त्यांची बदनामी करण्याची धमकी देऊन २५ लाख रुपयांची मागणी केली. जेव्हा निर्मात्यांनी विरोध केला, तेव्हा त्यांना मारहाण करण्यात आली. यावेळी एका व्यक्तीने चाकू काढला, तर विवेक जगतापने कमरेला लावलेले पिस्तुल दाखवून निर्मात्याला धमकी दिली.
advertisement
ओटीपी मागून घेतले १० लाख
या दबावाखाली निर्मात्यांना त्यांचा मोबाईल फोन आणि ओटीपी देऊन १० लाख रुपये ऑनलाइन ट्रान्सफर करावे लागले. आरोपींनी निर्मात्याच्या कर्मचाऱ्याला एक ईमेल लिहिण्यास भाग पाडलं, ज्यात असं लिहिलं होतं की, 'ही रक्कम निकिता घागला तिच्या अभिनयाच्या फीसाठी ॲडव्हान्स म्हणून दिली जात आहे.'
निर्मात्यांना ३ तास ऑफिसमध्येच बांधून ठेवल्यानंतर आरोपींनी तिथून पळ काढला. त्यांनी ऑफिसमधील कर्मचाऱ्यांनाही पोलिसांशी संपर्क साधल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशी धमकी दिली. या तक्रारीनंतर पोलिसांनी निकिता घाग, विवेक जगताप आणि त्यांच्या अज्ञात साथीदारांविरुद्ध अनेक गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल केला असून पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.