दिल्ली पोलिसांच्या काउंटर इंटेलिजेंस टीमने एक कट उधळून लावला आहे. कालिंदी कुंज परिसरात मध्यरात्री झालेल्या चकमकीत गँगस्टर रोहित गोदारा आणि वीरेंद्र चरण टोळीतील दोन शूटर जखमी अवस्थेत पकडले गेले. पोलीस सूत्रांनुसार, हे दोघे प्रसिद्ध स्टँड-अप कॉमेडियन मुनावर फारुकी यांची हत्या करण्याचा कट रचत होते.
सूत्रांनुसार, अटक केलेल्या गुन्हेगारांची ओळख पटली आहे. राहुल हा पानिपतचा रहिवासी आहे आणि साहिल हा भिवानीचा रहिवासी आहे. हे शूटर डिसेंबर 2024 मध्ये हरियाणामध्ये झालेल्या तिहेरी हत्याकांडात वॉन्टेड होते आणि ते फरार होते. यावेळी त्यांचे नवे लक्ष्य मुनावर फारुकी होते. पोलिसांचा दावा आहे की, दोन्ही गुन्हेगारांनी मुनावरच्या हत्येची योजना आखली होती आणि मुंबई आणि बेंगळुरूमध्ये त्याच्या लपण्याच्या ठिकाणांची रेकीही केली होती.
advertisement
दिल्ली पोलिसांच्या काउंटर इंटेलिजेंसला काल रात्री माहिती मिळाली की, कुख्यात रोहित गोदरा-गोल्डी ब्रार-वीरेंद्र चरण टोळीतील शूटर्स दिल्लीतील न्यू फ्रेंड्स कॉलनीमध्ये फिरत आहेत. पथकाने ताबडतोब कालिंदी कुंजमधील पुष्ता रोडवर सापळा रचला. पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास, मोटारसायकलवरून आलेल्या दोन्ही संशयितांनी पोलिसांना पाहताच पळ काढला आणि गोळीबार केला. प्रत्युत्तरादाखल पोलिसांनी त्यांच्या पायात गोळ्या घालून त्यांना पकडले.
चकमकीत जखमी झालेल्या दोन्ही शूटर्सना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळावरून पोलिसांनी शस्त्रे आणि एक मोटारसायकल जप्त केली आहे. दिल्ली पोलिसांच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने खुलासा केला की, ही टोळी परदेशात राहणारे रोहित गोदरा आणि गोल्डी ब्रार यांच्या इशाऱ्यावर काम करत होती. मुनावर फारुकी त्यांचे लक्ष्य होते. मुनावर फारुकी त्याच्या वादग्रस्त विधानांमुळे गँगच्या रडारवर आला होता, असं पोलिसांचं म्हणणं आहे. मुन्नवरच्या हत्येची सुपारी कोणी दिले आणि कटात आणखी कोण सामील आहे हे शोधण्यासाठी दोन्ही शूटर्सची चौकशी केली जात आहे.
या चकमकीनंतर, मुनावर फारुकी यांच्या हत्येच्या प्रयत्नामागे कोणते शत्रुत्व होते आणि कोणाच्या इशाऱ्यावर ही गँग मुन्नवरला टार्गेट करत होती, असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. दिल्ली पोलिसांच्या म्हणण्यानुसार, ते या प्रकरणाची सखोल चौकशी करत आहेत.