अभिजित खांडकेकरला अश्रू अनावर
'झी मराठी'च्या सोशल मीडिया पेजवर शेअर करण्यात आलेल्या या व्हिडिओमध्ये अभिनेता अभिजित खांडकेकर प्रियाबद्दल बोलताना खूपच भावूक झाल्याचे दिसतो. बोलता-बोलता त्याला अश्रू अनावर झाले आणि त्याचा कंठ दाटून आला.
advertisement
अभिजित म्हणाला, "आजचा हा सोहळा स्वप्नांचा आहे. सगळी स्वप्नं सजतायेत, रंगतायेत. पुरस्कार जाहीर होतायेत. याच निष्ठेने एका हरहुन्नरी अभिनेत्रीने आपली प्रत्येक भूमिका जिवंत केली. मग ती नायिका असो किंवा खलनायिका..." यावेळी बोलता बोलता अभिजीतचा कंठ दाटून आला आणि नकळत त्याचे अश्रू ओघळू लागले. आपल्या लाडक्या मैत्रिणीबद्दल बोलताना अभिजितला झालेले दुःख पाहून उपस्थितांचेही डोळे पाणावले.
मृण्मयी देशपांडेने प्रिया मराठेला दिली मानवंदना
अभिजीतची अवस्था पाहून अभिनेत्री मृण्मयी देशपांडेने पुढील जबाबदारी आपल्या हाती घेतली. तिने प्रियाच्या कामाची आठवण करून दिली. ती म्हणाली, "या सुखांनो या मालिकेतून तिने झी मराठीवर पदार्पण केले. त्यानंतर 'तू तिथे मी' मधील प्रिया मोहिते या खलनायिकेची छाप तिने पाडली. 'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिकेतील तिची 'गोदावरी' प्रेक्षकांना भावली, तर 'येऊ कशी कशी मी नांदायला' मधील तिची 'बॉस'ची भूमिकाही ओमकार-स्वीटूच्या मागे खंबीरपणे उभी राहिली."
मृण्मयीने पुढे सांगितले की, "पडद्यावरच्या भूमिका रंगवत ती खऱ्या आयुष्यातली जवळची मैत्रीण झाली, आदर्श मुलगी आणि सदैव साथ देणारी बायकोसुद्धा झाली. मी एवढंच सांगेन, प्रिया आजही आहे... आपल्या स्मृतीत आहे, तिच्या कलाकृतींमध्ये आहे आणि सगळ्यांच्या मनामध्ये आहे."
पुरस्कार सोहळ्यात उपस्थितांनी प्रिया मराठेला श्रद्धांजली अर्पण केली. विशेष म्हणजे, प्रिया मराठे आणि अभिजित खांडकेकर यांचे मैत्रीचे नाते खूप खास होते आणि त्यांनी 'तुझेच मी गीत गात आहे' या मालिकेमध्ये एकत्र काम केले होते. आपल्या मैत्रिणीच्या जाण्याने झालेले हे दुःख अभिजितला स्टेजवर लपवता आले नाही.