अंगावर काटा आणणारा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला
काही वेळापूर्वीच पुन्हा शिवाजी राजे या सिनेमाचा अंगावर काटा आणणारा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ३ मिनिटे ३४ सेकंदाच्या या ट्रेलरने प्रेक्षकांची उत्सुकता आणखीनच वाढवली आहे. आजवर कधीच दिसलं नाही असं छत्रपती शिवाजी महाराजांचं प्रखर रूप यात दिसणार असून मराठीची अस्मिता, बळीराजाच्या आत्महत्येचा मुद्दा, मराठी माणसांचं मुंबईतील स्थान, परप्रांतीयांची मुजोरी अशा अनेक विषयांवर महाराजांचं भाष्य आणि कृती यातून बघायला मिळणार आहे.
advertisement
पुन्हा शिवाजी राजे सिनेमाच्या ट्रेलर लाँच कार्यक्रमामध्ये राज ठाकरे यांनी महेश मांजरेकर यांचं तोंड भरून कौतुक केलं आहे. राज ठाकरे म्हणाले, महेश खरंच झपाटलेला माणूस आहे. मागे त्याचा वेडात मराठे वीर दौडले सात हा चित्रपट पाहिला. तो जे पाहतो आणि करतो ते भव्य असतं. महाराष्ट्राबद्दलच्या संवेदना जाग्या असल्याशिवाय असे चित्रपट बनत नाहीत. शेतकरी आत्महत्येचा विषय अशा प्रकारे मांडणं हे धाडस आहे.
राज ठाकरेंनी केलं महेश मांजरेकरांचं कौतुक
यावेळी राज ठाकरे यांनी महेश मांजरेकर यांची तुलना थेट यश चोप्रा यांच्याशी केली. ते म्हणाले, हिंदी चित्रपट सृष्टीतील यश चोप्रा आणि मराठीमध्ये महेश मांजरेकर हे निश्चित आहे. या चित्रपटाला महाराष्ट्र उचलून धरेल अशी खात्री आहे. आजवर छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर अनेक चित्रपटाचे लोकांनी उचलून धरले, पण हा सिनेमा वर्तमान आणि इतिहास असा दोन्ही विषयावर आधारित आहे.
तथापि, या चित्रपटात सिद्धार्थ बोडके छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुख्य भूमिकेत दिसणार आहे. त्याचबरोबर अभिनेता विक्रम गायकवाड, शशांक शेंडे, मंगेश देसाई, पृथ्वीक प्रताप, रोहित माने, नित्यश्री अशी कलाकारांची तगडी फौज आहे. याशिवाय राष्ट्रीय पुरस्कार विजेते बाल कलाकार त्रिशा ठोसर आणि भार्गव जगताप यांच्याही यात महत्त्वाच्या भूमिका आहेत. महेश मांजरेकर लिखित-दिग्दर्शित 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' या चित्रपटाकडून प्रेक्षक आणि समिक्षकांना खूप अपेक्षा आहेत. हा चित्रपट 31 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्रात रिलीज होणार असून तो बॉक्स ऑफिसवर काय कमाल करतो हे पाहण्यासाठी सर्वच उत्सुक आहेत.