टेक्नॉलॉजी मदतीसाठी असते, छळासाठी नाही!
बुधवारी श्रीलीलाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक अत्यंत भावूक पोस्ट शेअर केली. हात जोडून तिने चाहत्यांना विनंती केली की, "मी सर्व सोशल मीडिया वापरकर्त्यांना विनंती करते की, कृपया 'AI-जनरेटेड' फालतूपणाला पाठिंबा देऊ नका. तंत्रज्ञानाचा वापर करणे आणि त्याचा गैरवापर करणे यात खूप मोठा फरक आहे. माझ्या मते, तंत्रज्ञानातील प्रगती ही जीवन सोपे करण्यासाठी असते, गुंतागुंतीचे आणि भयावह करण्यासाठी नाही."
advertisement
श्रीलीला पुढे म्हणाली की, "कला क्षेत्राची निवड केली असली तरी, प्रत्येक मुलगी ही कोणाची तरी मुलगी, बहीण, मैत्रीण किंवा सहचारी असते. आम्हाला अशा उद्योगाचा भाग व्हायचे आहे जो आनंद पसरवतो, पण तोही आम्ही सुरक्षित आहोत या खात्रीने!"
शूटिंगच्या व्यग्र वेळापत्रकामुळे इंटरनेटवर काय सुरू आहे, याची कल्पना श्रीलीलाला नव्हती. पण जेव्हा तिच्या हितचिंतकांनी तिला हे बनावट व्हिडिओ दाखवले, तेव्हा तिला धक्काच बसला. ती म्हणते, "मी नेहमीच टीका पचवून स्वतःच्या जगात राहते. पण हे जे काही घडतंय ते अत्यंत त्रासदायक आणि उद्ध्वस्त करणारं आहे. माझ्या अनेक सहकारी अभिनेत्रींनाही याच त्रासातून जावे लागत आहे, त्यांच्या वतीने मी आज बोलत आहे." श्रीलीलाने स्पष्ट केले की, आता हे प्रकरण कायदेशीर यंत्रणांच्या हाती सोपवण्यात आले असून, दोषींवर कडक कारवाई केली जाईल.
