अभिनेते सयाजी शिंदे यांनी आपल्या सकस कलाकृतींनी आणि अभिनयाच्या जोरावर मराठीसह हिंदी, साऊथ सिनेसृष्टीतही आपला वेगळा ठसा उमटवला आहे. आपल्या अंगभूत असलेल्या क्षमतांचा पुरेपूर वापर करत डबिंग आर्टिस्ट,अभिनय, दिग्दर्शन ते नाट्यनिर्माता अशी चौफेर मुशाफिरी करत अजित भुरे यांनी आपला वेगळेपणा दाखवून दिला आहे. या दोन कलासंपन्न कलाकारांना या नाटकाने एकत्र आणले आहे.
advertisement
सुमुख चित्र आणि आर्यन्स ग्रुप ऑफ कंपनीज् च्या सहकार्याने अनेक नव्या नाट्यकृती रंगभूंमीवर येतायेत. या नव्या नाटकासाठी या दोन दिग्गज मान्यवरांना एकत्र आणण्याची किमया त्यांनी साधली आहे. या निर्मिती संस्थेचं हे तिसरं नाट्यपुष्प आहे. या दोन अनुभवी कलाकारांच्या एकत्र येण्याने हे नवं नाटक कोणतं ? याची उत्सुकता ही शिगेला पोहचली आहे. या दोन अवलिया कलाकारां व्यतिरिक्त या नाटकात कोण आहे ? या नाटकाचं नाव काय ? या सगळ्या गोष्टी गुलदस्त्यात आहे. लवकरचं या नाटकाचा शुभारंभ केला जाणार आहे.
नव्या नाटकाच्या निमित्ताने अभिनेते सयाजी शिंदे हे तब्बल 22 वर्षांनी रंगभूमीवर पुनरागमन करणार आहेत. तर नाट्यनिर्माता अजित भुरे 6 वर्षांनी पुन्हा दिग्दर्शनाकडे वळले आहेत. कलासंपन्न अशा दोन कलाकारांची नाट्यकृती प्रेक्षकांसाठी पर्वणी असेल.
नव्या नाटकाबद्दल सांगताना सयाजी शिंदे म्हणाले, ‘नाटकात काम करण्याच्या हेतूने मी मुंबईत आलो होतो पुढे चित्रपटांमध्ये व्यस्त झालो. आता पुन्हा एकदा रंगभूमीवर काम करता येणार याचा आनंद आहेच. दर 5 वर्षांनी माणूस आणि गोष्टी बदलतात असे म्हणतात. या बदलाला या नव्या नाट्यकृतींच्या माध्यमातून जाणून घेण्याचा माझा प्रयत्न असणार आहे. ‘जुनं ते सोनं’ असं म्हणतात, याच जुन्या विषयाचा नव्या अंगाने आढाव घेणारं काहीतरी करण्याची इच्छा असताना या नाट्यकृतीची विचारणा झाली."
सयाजी शिंदे पुढे म्हणाले, "अजित भुरे सारखा कलासक्त माणूस ज्याच्यासोबत मी प्रायोगिक काम केलं. आता या नाटकाच्या निमित्ताने व्यावसायिक काम करताना त्याच्याकडून नवं काहीतरी शिकायला मिळणार. कलाकारापेक्षा माणूस महत्त्वाचा असं म्हणणाऱ्या अजित आणि मी मनोरंजनाचा समृद्ध असा काळ पहिला आहे. त्यामुळे याच समृद्धतेचा अनुभव त्याच्या सोबतीने नाट्यरसिकांना पुन्हा देता येणार हे मला खूप महत्त्वाचं वाटतं."