ज्येष्ठ सिनेसमीक्षक दिलीप ठाकूर यांनी धर्मेंद्र यांच्या मैत्रीच्या एका अविस्मरणीय किस्स्याची आठवण सांगितली होती, ज्यामध्ये धर्मेंद्र यांनी मैत्रीखातर एका मराठी चित्रपटात काम केले होते. दिलीप ठाकूर यांनी सांगितल्यानुसार, मुंबईतील चांदिवली स्टुडिओचे मालक हेमंत कदम हे धर्मेंद्र यांचे घनिष्ठ मित्र होते. धर्मेंद्र हिंदीतील सुपरस्टार झाल्यानंतरही ते आपल्या मित्राला विसरले नाहीत.
advertisement
त्याकाळी हिंदीतील आघाडीचे नायक लहान बजेटच्या चित्रपटांमध्ये काम करण्यास तयार नसायचे. पण, धर्मेंद्र यांनी आपल्या मित्रासाठी, हेमंत कदम यांच्या 'हिचं काय चुकलं' या मराठी चित्रपटातील एका गाण्यासाठी होकार दिला होता. धर्मेंद्र यांनी आपल्या बिझी शेड्युलमधून दोन दिवसांचा वेळ काढला आणि चांदिवली स्टुडिओत या गाण्याचे शूटिंग पूर्ण केले होते.
विक्रम गोखलेंसोबतचा धमाल डान्स
धर्मेंद्र यांनी ज्या गाण्यासाठी शूटिंग केले, ते गाणे खूप गाजले. विशेष म्हणजे, या गाण्यात त्यांनी दिवंगत अभिनेते विक्रम गोखले यांच्यासोबत कमाल अभिनय केला होता. 'घेऊन टांगा सर्जा निघाला, दूर धन्याचा गाव, अरे तू धाव....' हे ते गाणे. या गाण्यात दोघांच्या केमिस्ट्रीला प्रेक्षकांनी खूप पसंत केले होते. दिलीप ठाकूर सांगतात की, केवळ धर्मेंद्र यांच्या उपस्थितीमुळे हा मराठी चित्रपट आणि विशेषतः हे गाणे त्या काळात प्रचंड लोकप्रिय ठरले होते.
