युरिक ॲसिड म्हणजे काय ?
युरिक ॲसिड हा शरीरात एक टाकाऊ पदार्थ असतो, जो प्युरीन नावाच्या रसायनाच्या विघटनाने तयार होतो. घाण किंवा टाकाऊ पदार्थ किडनी फिल्टर करून शरीराबाहेर टाकते. पण जेव्हा किडनी नीट काम करत नाही, तेव्हा ते सांध्याभोवती क्रिस्टल्सच्या स्वरूपात जमा होऊ लागते. शरीरात युरिक ॲसिडचे प्रमाण वाढल्यामुळे सांधे दुखणे, सूज येणे, चालताना पाय दुखणे असे त्रास सुरू होतात. आता जाणून घेऊयात युरिक ॲसिडचा त्रास दूर करण्याचे सोपे पर्याय.
advertisement
युरिक ॲसिडच्या त्रासामुळे तुम्हाला प्रचंड वेदना, सांधेदुखी होत असेल, डॉक्टरांच्या गोळ्या-औषधांनी देखील तुम्हाला फरक पडत नसेल तर आम्ही सांगतो ती पथ्यं पाळा म्हणजे तुमचा त्रास आपोआपच दूर होईल. यासाठी तुम्हाला काही पदार्थ तुमच्या रोजच्या आहारातून वगळावे लागणार आहेत.
युरिक ॲसिडचा त्रास कमी करण्यासाठी कोणते पदार्थ टाळावेत ?
- लाल मांस, ट्यूना मासे, जास्त प्रथिनं आणि चरबी असलेलं सीफूड
- आंबट चटण्या, गोड पदार्थ, सरबत, कोल्ड ड्रिंक्स,
- म्हशीचं दूध आणि दुधापासून बनवलेले पूर्ण चरबीयुक्त दुग्धजन्य पदार्थ
- अल्कोहोल, बिअर आणि अन्य कार्बोनेटेड ड्रिंक्स
- उच्च-प्रथिनं असलेले अन्नपदार्थ
कोणते पदार्थ टाळायचे हे समजून घेतल्यानंतर आता जाणून घेऊयात कोणते पदार्थ खायचे ते. आहारात करा ‘या’ पदार्थांचा समावेश
व्हिटॅमिन सीयुक्त पदार्थ :
जर तुम्हाला शरीरातील युरिक ॲसिडचं प्रमाण नैसर्गिकरित्या कमी करायचं असेल, तर तुमच्या आहारात व्हिटॅमिन सी युक्त फळं आणि अन्नपदार्थांचं प्रमाण वाढवावं लागेल. व्हिटॅमिन सी नैसर्गिकरित्या युरिक ॲसिड कमी करायला मदत करतं.
खनीजं :
फॉलिक ॲसिड आणि ओमेगा 3 फॅटी ॲसिड असलेल्या पदार्थांचा तुमच्या आहाराचा समावेश करा. यामुळे युरिक ॲसिड आपसूकच नियंत्रणात येईल.
आल्याचा चहा :
शरीरातली युरिक ॲसिडची पातळी कमी करण्यासाठी आल्याचं सेवन फायदेशीर ठरते. आल्यामध्ये दाहक-विरोधी आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्म असतात. जे सांधेदुखी आणि सूज कमी करण्यास मदत करतात. याशिवाय, शरीरातील वाढलेलं युरिक ॲसिड कमी करण्यास देखील आलं मदत करतं. आल्याच्या सेवनाने शरीरातील टॉक्सिन्स आणि प्युरिन काढून टाकण्यास मदत होते. आल्याच्या नियमित सेवनाने युरिक ॲसिडच्या दुखण्यापासून आराम मिळू शकतो.
हळद :
हळदीची ओळख नैसर्गिक अँटीबायोटीक अशी आहे. याशिवाय हळदीत असलेल्या दाहक विरोधी गुणधर्मांमुळे सांधेदुखीच्या त्रासापासून आराम मिळू शकतो. यासोबतच हळद युरिक ॲसिडचं प्रमाण नियंत्रित ठेवायला मदत करते.
हे सुद्धा वाचा: Uric Acid Problem in winter : हिवाळ्यात युरिक ॲसिडमुळे दुखतात सांधे? मग खा ही फळं, युरिक ॲसिडचा त्रास होईल कमी
व्यायाम :
युरिक ॲसिडचा त्रास कमी करण्यासाठी योग्य आहारासोबतच वजन नियंत्रित ठेवणंही महत्त्वाचं ठरतं. त्यामुळे शारीरिकदृष्ट्या फिट राहण्यासाठी व्यायाम करणं आणि पौष्टिक आहाराचं सेवन केल्याने रक्तातलं युरिक ॲसिडचं प्रमाण नियंत्रणात राहायला मदत होते.
पुरेसं पाणी पित राहा :
योग्य प्रमाणात पाणी प्यायल्यामुळे शरीर तर हायड्रेट तर राहतंच मात्र, रक्तातलं अतिरिक्त युरिक ॲसिड बाहेर काढून टाकायला मदत होते.