डार्क सर्कल का येतात?
डोळ्यांखाली काळी वर्तुळं म्हणजे डार्क सर्कल येण्यासाठी विविध मुद्दे कारणीभूत ठरू शकतात. अपुरी झोप, धूम्रपान, जास्त मद्यपान आणि तणाव ही काही प्रमुख कारणं आहेत. अपुऱ्या झोपेमुळे डोळ्यांखालची त्वचा फिकट होते. ज्यामुळे रक्तवाहिन्या दिसू लागतात यालाच आपण काळी वर्तुळं म्हणतो. सतत सूर्यप्रकाशात राहिल्याने त्वचेखाली मेलॅनिनचं प्रमाण वाढून ते डोळ्यांभोवती एकत्र आल्याने डोळ्याखाली काळी वर्तुळं दिसू लागतात.
advertisement
जाणून घेऊयात घरगुती उपचारामुळे डार्क सर्कल कसे दूर करता येतील ते.
काकडी आणि बटाट्याचा वापर:
काकडी आणि बटाट्यामध्ये नैसर्गिक ब्लिचिंग गुणधर्म असतात. ज्यामुळे डार्क सर्कल जाण्यास मदत होते. जर या डार्क सर्कलचा रंग फारच गडद असेल तर तो फिका व्हायला मदत होते.
वापर करा करायचा ?
काकडी: काकडी स्वच्छू धुवून तिचे बारीक तुकडे करा.थोड्यावेळासाठी हे तुकडे फ्रिजमध्ये ठेवा आणि मग काढून 10-15 मिनिटांसाठी डोळ्यांवर ठेवा.यामुळे डोळ्यांना थंडावा मिळून डोळ्यांना आलेली सूजही कमी व्हायला मदत होते.
बटाटा: बटाटा धुवून घ्या. मग त्याला किसून त्याचा रस काढा. बटाट्याच्या या रसात एक छोटा कापसाचा बोळा घेऊन या बोळ्याच्या सहाय्याने बटाट्याचा रस डोळ्यांखाली लावा. कापसाचा बोळा डोळ्यांवर 10 मिनिटांसाठी ठेवून थंड पाण्याने धुवून घ्या.
गुलाबपाणी आणि ग्रीन टी बॅग:
गुलाबपाणी: गुलाबपाणी हे एक नैसर्गिक टोनर आहे जे त्वचेला थंडपणा आणि आर्द्रता देतं. गुलाबपाण्यात कापूस भिजवून डोळ्यांवर 15 मिनिटांसाठी ठेवून द्या. यामुळे काळी वर्तुळे तर कमी होतातच पण डोळ्यांना आराम मिळतो.
ग्रीन टी बॅग: ग्रीन टी मध्ये अँटीऑक्सिडंट्स असतात. त्यामुळे ग्रीन टी बॅग थंड करून डोळ्यांवर ठेवल्यास काळी वर्तुळं तर कमी होतातच मात्र डोळ्याचं आरोग्यही सुधारतं
बदाम तेल आणि खोबरेल तेल:
बदाम तेल आणि खोबरेल तेल डार्क सर्कल्स दूर करण्यासाठी प्रभावी आहेत. रात्री झोपण्यापूर्वी डोळ्यांखाली हलक्या हाताने बदामाच्या तेलाची मालिश केल्यास त्वचेचं झालेलं नुकसान भरून येतं. तेलामुळे त्वचा मॉइश्चरायझ व्हायला मदत होतो आणि डार्क सर्कलची समस्याही कालांतराने कमी होते. बदाम तेल आणि खोबरेल तेलाच्या नियमित वापराने त्वचेची चमक वाढते.
डार्क सर्कल येऊ नये म्हणून घ्या 'ही' काळजी :
डार्क सर्कल्स आल्यानंतर ते घालवण्यासाठीच्या घरगुती टिप्स आपण पाहिल्या. मात्र डार्क सर्कल्स येऊ नयेत यासाठी तुम्हाला काळजी घ्यावी लागणार आहे. आपण पाहिलं की अपुरी झोप ही डार्क सर्कल येण्याचं एक महत्त्वाचं कारण आहे. त्यामुळे तुम्ही पुरेशी झोप घ्या. रोज किमान 8 तासांची झोप तुम्हाला आवश्यक आहे. दररोज 8-10 ग्लास पाणी प्या. ज्यामुळे तुमचं शरीर हायड्रेट राहील ज्याचा फायदा त्वचेला सुद्धा होईल.