मुंबई : स्वप्न सर्वजण पाहतात, पण ते पूर्ण करण्यासाठी प्रयत्न मात्र फार कमीजण करतात. अशाचप्रकारे मुंबईतील 3 मैत्रिणींनी एकत्र पाहिलेलं स्वप्न साकार करून दाखवलंय. शाळेतली मैत्री क्वचितच पुढे टिकून राहते. या मैत्रिणींनी तर शाळेत पाहिलेलं स्वप्नही टिकवलं आणि ते साकारही केलं. आज त्यांचा स्वतःचा फूड बिजनेस आहे.
तन्वी, दिव्या आणि श्रुती या 3 मैत्रिणी फूड ट्रक चालवतात. त्यांच्याकडील अन्नपदार्थ खाण्यासाठी ग्राहकांची मोठी गर्दी असते. या व्यवसायातून त्यांची महिन्याकाठी 50 हजारांहून अधिक कमाई होते. शिवाय स्वप्न पूर्ण झाल्याचं समाधान आहेच.
advertisement
हेही वाचा : नाद खुळा! शेतकरी कारमधून विकतो भाजी, लोक बघतच बसतात; उलाढाल लाखोंची
त्या सांगतात, 'आम्ही लहानपणापासून शाळेत एकत्र होतो. तेव्हापासून आमचं स्वप्न होतं की मोठेपणी काहीतरी व्यवसाय करायचा. तेव्हा मस्करीत म्हणायचो पण ते सत्यात उतरेल याची कल्पनाही केली नव्हती. मात्र आज तेच सत्य आहे. आमच्या फूड ट्रकला 2 वर्षे झाले. जेव्हा सुरूवात केली तेव्हा व्यवसाय कसा चालेल याबाबत काळजी वाटत होती मात्र सगळं छान चाललंय. 2 वर्षात खूप मेहनत घेतली, कुटुंबियांनी सपोर्ट केला. विलेपार्लेमध्ये 2 आउटलेटसुद्धा सुरू केले आहेत', अशी माहिती त्यांनी दिली.
त्यांच्या फूड ट्रकमध्ये रेग्युलर, गोल्डन कॉर्न, व्हाइट चीज सॉस, गार्लिक क्रीम, इत्यादी वेगवेगळ्या प्रकारचा पास्ता मिळतो. तसंच चीज, फ्राइड, तंदुरी, पनीर, व्हेज, नॉनव्हेज असे वेगवेगळे मोमोज, फ्रँकी आणि भरपूर पदार्थ याठिकाणी 80 रुपयांपासून 200 रुपयांपर्यंत मिळतात. त्यामुळे ग्राहकांनाही ते परवडतात. अंधेरीतील विजय नगर परिसरात हा ट्रक आहे. जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर तिन्ही मैत्रिणींनी हा व्यवसाय सांभाळलाय. त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.