दिल्ली : कोणत्याही पदार्थाची फोडणी टोमॅटोशिवाय जवळपास अपूर्ण असते. काहीजण लालचुटूक टोमॅटो कच्चेच खातात. परंतु टोमॅटोचा उपयोग हा फक्त अन्नपदार्थांना चव देण्यापुरतं मर्यादित नसतो बरं का, तर टोमॅटो अनेक पौष्टिक, आरोग्यपयोगी गुणधर्मांनी परिपूर्ण असतात. त्यात व्हिटॅमिन ए, सी, के आणि पोटॅशियम भरपूर प्रमाणात असतं. शिवाय टोमॅटोत असणारं लायकोपिन तत्त्व शरिरासाठी अत्यंत फायदेशीर ठरतं. एकूणच टोमॅटोमधून आरोग्याला काय फायदे मिळतात, सविस्तरपणे जाणून घेऊया.
advertisement
डॉक्टर सांगतात की, पाणी हे शरिरासाठी अमृतासमान असतं. त्यामुळे शरिरात कधीच पाण्याची कमतरता निर्माण होऊ देऊ नये. त्यासाठी भरपूर पाणी प्यावंच, शिवाय रसाळ फळंसुद्धा खावी. फळांचा रस, ताक, लिंबूपाणी, नारळपाणी प्यायलात तर उत्तमच. टोमॅटोचा रस पिण्याचा सल्लाही दिला जातो. या रसाचे आश्चर्यजनक फायदे वाचून तुम्हीसुद्धा आजच त्याचा आहारात समावेश कराल.
हेही वाचा : गरोदरपणात करावी 'ही' योगासनं, नॉर्मल डिलिव्हरी होण्याची शक्यता
डॉ. अंकुर जैन यांनी सांगितलं की, टोमॅटोमध्ये भरपूर पोषक तत्त्व असल्याने त्यातून आरोग्याला अनेक फायदे मिळतात. टोमॅटोचा रस प्यायल्यास डोळ्यांचं आरोग्य सुदृढ राहतं. या रसामुळे डायबिटीजवर नियंत्रण मिळवण्यास मदत होते. शरिराची रोगप्रतिकारक शक्ती कमालीची वाढते, शिवाय वजन कमी होण्यातही टोमॅटोचा वाटा महत्त्वाचा असतो.
तसंच टोमॅटोच्या रसामुळे अन्नपचन सुरळीत होतं. पोट व्यवस्थित साफ झाल्यानं चेहऱ्यावर छान ग्लो येतो. त्वचा तजेलदार दिसते. सर्वात महत्त्वाचं म्हणजे टोमॅटोचा रस दररोज प्यायल्यास हळूहळू शरिरातलं बॅड कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत मिळते.
सूचना : इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. तरी आपण आपल्या आरोग्याबाबत कोणताही निर्णय घेण्यापूर्वी स्वतः डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. कोणत्याही नुकसानासाठी न्यूज18 मराठी जबाबदार नसेल.