नाशिक: इंजिनिअरिंगचं शिक्षण घेताना मनं जुळली अन् प्रेमाच्या आणाभाका झाल्या. इंजिनिअर जोडप्यानं कुटुंबीयांकडे लग्नाचा प्रस्ताव दिला. पण लग्नात जातीचा अडथळा आला. आंतरजातीय विवाहासाठी कुटुंबीयांनी एक अट घातली. अशात नाशिकमध्ये चांगली नोकरी मिळून स्वत:च्या पायावर उभं राहणं कठीण होतं. म्हणून स्वाती आणि अभिलाष यांनी थेट फूड ट्रक लावण्याचा निर्णय घेतला. आता या व्यवसायातून हे जोडपं लाखोंची कमाई करत असून सुखानं संसार करतंय.
advertisement
नाशिकमधील स्वाती आणि अभिलाष हे इंजिनिअरिंगचं शिक्षण घेत असताना एकमेकांच्या प्रेमात पडले. परंतु, आंतरजातीय विवाहाला कुटुंबीयांनी विरोध केला. स्वत:च्या पायावर उभा राहिल्यासच लग्न लावून देऊ, अशी भूमिका कुटुंबीयांनी घेतली. तेव्हा नाशिकमध्ये चांगल्या पगाराची नोकरी मिळणं अवघड होतं. त्यामुळे नोकरी करत त्यांनी घरातूनच टिफिन सर्व्हिस सुरू केली. 2019 पासून ते घरोघरी जाऊन जेवणाचा डबा पोहोच करू लागले.
घे भरारी! शेतमजूर महिलेनं करून दाखवलं, महाराष्ट्रात फेमस झालाये हा ब्रँड!
पुढे नोकरीपेक्षा व्यवसायातच काहीतरी करण्याचा निर्णय स्वाती आणि अभिलाष यांनी घेतला. फक्त टिफिन सर्व्हिसवर भागणार नव्हतं. यासाठी त्यांनी स्वत:चा स्ट्रीट फूड स्टॉल सुरू करायचं ठरवलं. याबाबत कुटुंबीयांना कल्पना दिली असता त्यांनी हा निर्णय त्यांच्यावरच सोपवला. त्यामुळे दोघांनी मिळून फूड ट्रकच्या व्यवसायात नशीब आजमावायचं ठरवलं. पण, पहिल्याच दिवशी नवीन संकट उभं राहिलं. फूड ट्रक सुरू केल्याच्या पहिल्याच दिवशी देशात कोरोनामुळे लॉकडाऊन लागला. त्यामुळे केलेली गुंतवणूक आणि व्यवसाय देखील संकटात सापडला.
संकटात एकमेकांना साथ
कर्जाने पैसे घेऊन व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय कोरोनामुळे अंगलट आला. हातची नोकरी देखील गेली. सगळीकडून संकटांनी गाठलं असताना देखील दोघांनी एकमेकांची साथ दिली. लॉकडाऊन संपलं आणि त्यांनी पुन्हा आपला व्यवसाय सुरू केला. स्वाती आणि अभिलाष यावरून ‘स्वाभिज’ या नावाने त्यांनी फूड ट्रक सुरू केला. 3-4 वर्षांच्या काळातच ‘स्वाभिज’ नाशिकमध्ये प्रसिद्ध झाला. खवय्ये विविध पदार्थांची चव घेण्यासाठी फूड ट्रकभोवती गर्दी करू लागले. त्यामुळे महिन्याकाठी स्वाती आणि अभिलाष यांची कमाई एक लाखांपर्यंत होतेय.
स्वाती आणि अभिलाष यांच्याकडे कॉर्न डॉग, हॉट डॉग यांसह 10 पेक्षा अधिक पदार्थ मिळतात. तसेच नॉनव्हेज पदार्थ देखील याठिकाणी उपलब्ध असून अगदी 100 रुपयांपासून हे पदार्थ मिळतात. मोठे इव्हेंट्स्ट, पार्टी, कार्यक्रम यांमध्ये देखील आम्ही फूड ट्रक लावतो. नाशिकमधील कॉलेज रोड परिसरात श्रद्धा पेट्रोल पंपासमोर डी.वाय.के कॉलेज जवळ रोज फूड ट्रक असतो. तसेच आम्ही ऑनलाईन ऑर्डर देखील घेत असल्याचं स्वाती आणि अभिलाष सांगतात.