छत्रपती संभाजीनगर : हिवाळ्यामध्ये उत्तम आरोग्यासाठी आहाराची काळजी घेणं गरजेचं असतं. त्यामुळे अनेकजण थंडीच्या हंगामातील फळे आणि भाजीपाला खाण्याला प्राधान्य देतात. हिवाळ्यातील मुख्य पीक म्हणजे तूर आणि याच तुरीला या काळात मोठ्या प्रमाणात शेंगा आलेल्या असतात. या शेंगा बाजारात विक्रीसाठीही दिसतात. तुरीच्या शेंगा खाण्याचे आरोग्यासाठी भरपूर फायदे आहेत. याबाबत छत्रपती संभाजीनगरमधील आहारतज्ज्ञ अलका कर्णिक यांनी माहिती दिलीये.
advertisement
आरोग्यदायी तूर
तुरीच्या शेंगांचे भरपूर फायदे आपल्या शरीराला होत असतात. तुरीच्या शेंगांमध्ये लोहाचं प्रमाण जास्त असतं. तसेच कॅल्शिअम देखील मुबलक असतं. तसेच तूर ही पोटॅशियम, मॅग्नेशियमचाही चांगला स्त्रोत मानली जाते. ही सर्व खनिजं उत्तम आरोग्यासाठी गरजेची असतात. त्यासोबतच यामध्ये भरपूर विटामिन्स आणि फायबर देखील आहे. तुरीची डाळ खाल्ल्यामुळे अनेक जणांना ऍसिडिटीचा त्रास होतो. पण जर तुम्ही फ्रेश तुरीचे दाणे घेतले आणि ते खाल्ले तर त्यामुळे तुम्हाला ऍसिडिटी होत नाही, असं कर्णिक सांगतात.
तुरीच्या काही खास रेसिपी
तुम्ही वेगवेगळ्या माध्यमातून तुरीच्या शेंगा खाऊ शकता. यामध्ये तुम्ही तुरीच्या शेंगांची आमटी, त्याचबरोबर कचोरी, पराठे हे करून खाऊ शकता. तसेच शेंगा उकडून देखील खाऊ शकता. यातून भरपूर फायदे भेटतात. तुरीच्या दाण्यांपासून तुम्ही जर काही करत असाल तर त्यात भरपूर ताजी कांद्याची पात वापरावी, असंही आहारतज्ज्ञ सांगतात.
लहान मुलांसाठी फायदे
लहान मुलांत बऱ्याचदा कॅल्शिअमची कमतरता असते. अनेक मुलांचे रात्री झोपेमध्ये पाय दुखतात किंवा इतरही त्रास होतो. तर या शेंगा खाल्ल्यामुळे ते त्रास होत नाहीत. त्यामुळे त्यांना तुरीच्या शेंगा देण्याचा फायदा होतो. तसेच मोठ्या व्यक्तींना खूप विकनेस असेल किंवा लवकर थकवा जाणत असेल तर तूर खाणे लाभदायी ठरते. यातून मुबलक प्रमाणात आयर्न मिळत असल्याने थकवा दूर होण्यास मदत होते. त्यामुळे वेगवेगळ्या माध्यमातून तुरीच्या शेंगा किंवा तुरीचे दाणे आवर्जून खावेत, असं आहारतज्ज्ञ सांगतात.





