बलिया : गायी, म्हशीचं दूध आरोग्यासाठी प्रचंड फायदेशीर असतं. म्हणूनच गायी, म्हशीच्या दूधउत्पादन व्यवसायातून नफादेखील उत्तम मिळतो. परंतु गाभण गायीचं किंवा म्हशीचं दूध पिण्याबाबत अनेकदा प्रश्न उपस्थित होतात. अशा परिस्थितीत दूध काढता येतं का, ते आरोग्यपयोगी असतं का, अशा सर्व प्रश्नांची उत्तरं आज आपण जाणून घेणार आहोत. पशूवैद्य एस.डी द्विवेदी यांनी याबाबत माहिती दिली आहे.
advertisement
डॉ. एस.डी द्विवेदी यांनी सांगितलं, गाभण गायी, म्हशीचं दूध काढलं जाऊ शकतं मात्र ही प्रक्रिया काळजीपूर्वक करावी. कारण गर्भावस्थेत प्राण्यांमध्ये हॉर्मोनल बदल होतात. त्याचा परिणाम त्यांच्या दुधाच्या गुणवत्तेवर होऊ शकतो.
डॉक्टरांनी पुढे सांगितलं, गायी, म्हशी गाभण असतानादेखील त्यांचं दूध अत्यंत पौष्टिक असतं. या दुधात भरपूर व्हिटॅमिन्स, मिनरल्स आणि प्रोटिन्स असतात. यातून फॅटी ऍसिडसह अनेक पोषक तत्त्व मिळतात. शिवाय यात अँटीबॉडीज भरपूर असल्यानं रोगप्रतिकारक शक्ती कमालीची वाढते. लहान मुलांपासून वृद्ध व्यक्तींपर्यंत सर्वांसाठी हे दूध फायदेशीर असतं. मात्र गर्भावस्थेत प्राण्यांमधील हॉर्मोन्सची पातळी वाढते, जे काही लोकांसाठी हानीकारक ठरू शकतं. विशेषतः गरोदर महिला आणि लहान मुलांना त्रास होऊ शकतो. त्यामुळे गाभण गायी, म्हशींची व्यवस्थित काळजी घ्यावी आणि त्यांचं दूध उकळूनच प्यावं.
गर्भावस्थेत प्राण्यांचं पूर्ण लक्ष हे नव्या जिवाच्या वाढीकडे असतं, अशावेळी त्यांच्या दुधाचं प्रमाण कमी होतं, जर जास्त दूध काढलं गेलं तर त्याचा प्राण्यांच्या आरोग्यावर दुष्परिणाम होऊ शकतो. त्याचबरोबर नव्या जीवाचं नुकसान होऊ शकतं. त्यामुळे गाभण गायी म्हशीचं जास्त दूध काढू नये. जास्त दूध काढल्यानं त्यांच्या शरिरावरील ताण वाढू शकतो. त्यामुळे प्रमाणात दूध काढावं. शिवाय प्राण्यांची काळजी घ्यावी, त्यांना पोषक आहार द्यावा. ज्यामुळे प्राण्यांचं आणि नव्या जीवाचं आरोग्य उत्तम राहतं.