सोलापूर : सोलापुरात छत्रपती संभाजी तलाव आणि किल्ला बाग परिसरात कावळे, घारी, बदकांना बर्ड फ्लूची बाधा झाल्याचे आढळून आले. यानंतर तेथे बर्ड फ्लू प्रतिबंध आणि नियंत्रणासाठी हाती घेतलेल्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे सक्त आदेश जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी प्रशासनाला दिले आहेत. या दरम्यान चिकन आणि अंडी खावी की नाही? या संदर्भात अधिक माहिती डॉ. विशाल येवले पशुसंवर्धन उपायुक्त यांनी दिली आहे.
advertisement
सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील नागरिकांनी बर्ड फ्लू आजाराच्या अनुषंगाने घाबरण्याचे कोणतेही कारण नाही. परंतु बाधित क्षेत्रातील चिकन शॉप बंद करण्यात आलेले आहेत. या परिसरातून चिकन खरेदी करू नये. बर्ड फ्लूची बाधा कोंबड्यांसोबत इतर पाळीव प्राण्यांना होते. त्यामुळे चिकनसह इतर पाळीव प्राण्यांचे मांस खावयाचे की नाही, असा प्रश्न निर्माण होतो.
मांस योग्य पद्धतीने शिजविलेले असेल तर ते खाण्यास सुरक्षित आहे. तसेच कोणत्याही ठिकाणाहून चिकन खरेदी केल्यानंतर ते 100 डिग्री तापमानावर व्यवस्थित शिजवून खावे. अंडी उकळून-बॉईल करून खावेत. कच्चे मांस अथवा अर्धवट शिजविलेले मांस खाणे टाळावे. तसेच, शिजविलेले अन्न आणि कच्चे मांस वेगवेगळे ठेवावे. बाधित क्षेत्रात नागरिकांनी जाऊ नये, असे डॉ. विशाल येवले पशुसंवर्धन उपायुक्त यांनी केले आहे.
काही दिवसांपूर्वी सोलापूर शहरातील छत्रपती संभाजी महाराज तलाव परिसर आणि किल्ला बाग परिसरात कावळा, घार, बदक यांचा मृत्यू झाला होता. या अनैसर्गिक मृत्यूचे कारण हे बर्ड फ्लू असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे सोलापूर जिल्हा प्रशासन अलर्ट झाले आहे. मध्य प्रदेश राज्यातील भोपाळ येथील हाय सिक्युरिटी ॲनिमल डिसीज लॅबोरेटरी या प्रयोगशाळेकडून अहवाल प्राप्त झाला आहे.