तुमच्या दिवाळीच्या फराळात ही पारंपरिक करंजीची चव टिकवून ठेवण्यासाठी, तिचे सारण आणि खुसखुशीत पारी बनवण्याची अचूक रेसिपी आज आम्ही तुम्हाला सांगत आहोत. इंस्टाग्रामवर मनीषा पाटील यांनी करंजीचे सारण त्याची संपूर्ण रेसिपी 2 व्हिडिओच्या माध्यमातून दिली आहे. या प्रकारे कारंजी बनवल्यास ती कधीच तेलात विरघळणारी किंवा फुटणार नाही.
करंजीचे सारण बनवण्यासाठी लागणारे साहित्य
advertisement
किसलेले सुके खोबरे - 1 कप
साजूक तूप - 3 चमचे
बारीक रवा - अर्धा कप
बारीक केलेले बदाम, काजू, चारोळी - आवडीनुसार
खसखस - 1 चमचा (ऐच्छिक)
बेसन - 2 चमचे
मिल्क पावडर - 2 चमचे
पिठी साखर - 1/2 कप
वेलची पावडर - 1/2 चमचा
मीठ - चिमूटभर
करंजीचे सारण बनवण्याची कृती
- 1 कप सुके खोबरे घ्या आणि ते मध्यम आचेवर हलके सोनेरी होईपर्यंत भाजून घ्या. ते बाजूला थंड होण्यासाठी ठेवा.
- एका कढईत 1 चमचा साजूक तूप गरम करा. त्यात अर्ध कप बारीक रवा टाकून 5 मिनिटे मंद आचेवर भाजून घ्या.
- नंतर त्याच कढईत पुन्हा 2 चमचे साजूक तूप घाला. त्यात बदाम, काजू, चारोळी, खसखस, 2 चमचे बेसन आणि 2 चमचे मिल्क पावडर टाका. सर्व साहित्य टाकल्यानंतर हे मिश्रण आणखी 5 मिनिटे चांगले भाजून घ्या.
- भाजलेले सर्व मिश्रण भाजलेल्या सुक्या खोबऱ्यामध्ये टाका.
- हे मिश्रण पूर्णपणे थंड झाल्यावर त्यात चिमूटभर मीठ, वेलची पावडर आणि अर्धा कप पिठी साखर घाला. हे सर्व व्यवस्थित एकत्र करून घ्या. अशा प्रकारे करंजीचे सारण तयार आहे.
करंजीची पारी आणि तळण्याची तयारी
साहित्य
चाळून घेतलेला मैदा - 2 वाट्या
बारीक रवा - पाव वाटी (मैद्याच्या वाटीने)
पिठी साखर - 1 चमचा
कडकडीत गरम साजूक तूप - 4 चमचे (पोह्याच्या चमच्याने)
मीठ - चिमूटभर
पाणी - आवश्यकतेनुसार
तेल - तळण्यासाठी
करंजी बनवण्याची कृती
- करंजी बनवण्यासाठी 2 वाट्या मैदा, पाव वाटी रवा, चिमूटभर मीठ आणि करंजीला छान रंग येण्यासाठी एक चमचा पिठी साखर घाला. हे सर्व व्यवस्थित मिक्स करा.
- करंजी खुसखुशीत आणि लेअर्सवाली होण्यासाठी त्यामध्ये पोह्याच्या चमच्याने 4 चमचे कडकडीत गरम साजूक तुपाचे मोहन घाला. तूप गरम असल्याने चमच्याने किंवा हाताने घासून मिश्रण चांगले मिक्स करून घ्या.
- यानंतर थोडे थोडे पाणी घालून घट्ट कणिक मळून घ्या. कणिक 1 तास तशीच झाकून ठेवा.
- 1 तासानंतर त्या कणकेचे सारख्या आकाराचे लहान लहान गोळे बनवा.
- एक गोळा घेऊन तो पातळ लाटून घ्या. त्यावर तयार केलेले सारण भरून साच्याच्या मदतीने किंवा हाताने करंजी बनवून घ्या.
- थोड्या थोड्या करंज्या बनवून त्या लगेच तळून घ्या. अन्यथा जास्तवेळ ठेवल्यास त्या कडक होतात आणि तेलात फुटू शकतात.
- मध्यम आचेवर तेल गरम करून त्यामध्ये करंज्या हलका सोनेरी रंग येईपर्यंत तळा.
अस्वीकरण : या बातमीत दिलेली माहिती आणि आरोग्याशी संबंधित सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून, डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतरच काहीही वापरा. त्याच्या वापरामुळे होणाऱ्या कोणत्याही नुकसानासाठी लोकल-18 जबाबदार राहणार नाही.