याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, सध्या मुंबईत अंधेरी-घटकोपर, अंधेरी पश्चिम- दहिसर -गुंदवली आणि आरे-वरळी या तीन मेट्रो मार्गिका सुरू आहेत. या मार्गावरून दररोज आठ ते नऊ लाख मुंबईकर प्रवास करतात. डिसेंबरमध्ये मेट्रो-9 दहिसर पूर्व- काशीगाव, मेट्रो-2 बी मंडाळे डायमंड गार्डन, मेट्रो-4 आणि मेट्रो-4 ए या मार्गिकांची भर पडणार आहे. सध्या या प्रकल्पांचं कामे अंतिम टप्प्यात आलं आहे. शिवाय, मेट्रो-3चा वरळी-कफ परेड हा टप्पाही लवकरच सुरू केला जाणार आहे.
advertisement
Vande Bharat Express: मुंबई-नांदेड प्रवास सुस्साट! 610 किमी अंतर होणार 9 तासांत पार
या मेट्रो मार्गिका येणार सेवेत
मेट्रो 9 दहिसर पूर्व ते काशीगाव (पहिला टप्पा): मेट्रो 9 हा मार्गाची एकूण लांबी 13.5 किलोमीटर असून त्याचा 4.5 किलोमीटरचा टप्पा वाहतुकीसाठी सुरू केला जाईल. या मार्गिकेवर दहिसर पूर्व, पांडुरंगवाडी, मीरा गाव, काशीगाव ही स्थानकं आहेत. सध्या मेट्रोच्या सुरक्षा चाचण्या सुरू आहेत. ही मार्गिका मेट्रो-2ए आणि मेट्रो-7 ला कनेक्ट होणार असल्याने पश्चिम उपनगरातील प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. या प्रकल्पाचासाठी 6,607 कोटी रुपयांचा खर्च केला जात आहे.
मेट्रो-4 आणि 4- ए कॅडबरी ते गायमुख (पहिला टप्पा): या प्रकल्पाची एकूण लांबी 35 किलोमीटर असून डिसेंबमध्ये त्यापैकी 5.3 किलोमीटरची मार्गिका सुरू केली जाईल. या मार्गिकेवर कॅडबरी, माजीवडा, कारबावडी, मानपाडा, टिकुजिनीवाडी, डोंगरी पाडा, विजय गार्डन, कासारवडवली, गोवनीवाडा, गायमुख ही स्थानकं आहेत. या मेट्रो सेवेमुळे ठाणे आणि घोडबंदर प्रवासाचं अंतर आणि वाहतूक कोंडी कमी होईल. प्रकल्पासाठी 15,548 कोटी रुपये खर्च केले जात आहेत.
मेट्रो-2 बी मंडाळे ते डायमंड गार्डन (पहिला टप्पा): या मार्गाची एकूण लांबी 23.6 किलोमीटर असून त्यापैकी 5.3 किलोमीटरची मार्गिका सुरू केली जाणार आहे. या मार्गिकेवर मंडाळे, मानखुर्द, बीएसएनएल, शिवाजी चौक, डायमंड गार्डन ही स्थानकं आहेत. सध्या मेट्रो ट्रेनच्या वेगवेगळ्या चाचण्या सुरू आहेत पूर्व आणि पश्चिम उपनगराला जोडणारी मंडाळे ते अंधेरीदरम्यानची ही महत्त्वपूर्ण मार्गिक आहे. पहिल्या टप्प्यामुळे रेल्वेच्या हार्बर मार्गावरील प्रवाशांना फायदा होईल. या प्रकल्पासाठी 10,986 कोटी रुपये खर्च केला जात आहे.
मेट्रो-3 वरळी-कफ परेड: मुंबईतील पहिला भुयारी मेट्रो प्रकल्प असलेल्या आरे-कफ परेड या मेट्रो 3च्या वरळी ते कफ परेड या सुमारे 9 किलोमीटर लांबीच्या तिसऱ्या टप्प्याचं काम पूर्ण झालं आहे. लवकरच हा मार्ग नागरिकांच्या सेवेत येणार आहे.
मुंबईत नुकत्याच झालेल्या मुसळधार पावसामुळे रस्ते आणि रेल्वेची लोकल सेवा कोलमडली होती. मेट्रो सेवा मात्र अखंडपणे सुरू होती. परिणामी पुढील चार महिन्यांत चार मेट्रो मार्गिकांचे पहिले टप्पे सुरू केले जाणार आहेत. त्याबाबतचं आवश्यक काम पूर्ण झालं असून, मेट्रोच्या चाचण्या सुरू असल्याची माहिती एमएमआरडीएच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.