वाशिम: सध्या लग्नसराईची हंगाम सुरू आहे. लग्नाळू तरुण आणि तरुणी लग्नबंधनात अडकत आहे. पण, ग्रामीण भागात नवरी मुलगी मिळत नसल्यामुळे मोठी पंचाईत होत आहे. अशातच याच्या त्याच्या ओळखीतून स्थळ शोधून आणली जात आहे. याचा फायदा घेत मागील काही वर्षांपासून विदर्भासह मराठवाड्यात दरोडेखोर नवरीने धुमाकूळ घातला आहे. वाशिममध्ये असाच एक प्रकार समोर आला आहे. लग्नाच्या नावाखाली नवरदेवाच्या वडिलांचं अपहरण करण्यात आलं होतं. अखेरीस या प्रकरणी ५ जणांना अटक केली आहे.
advertisement
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाशिमच्या रिसोड तालुक्यात लग्नाच्या नावाखाली फसवणूक करून अपहरण आणि दरोड्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणात रिसोड पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेनं संयुक्त कारवाई करत पाच आरोपींना अटक करण्यात आली असून इतर ८ सराईत गुन्हेगार फरार झाले आहेत. या सगळ्यांच्या विरोधात फसवणूक,अपहरण आणि दरोडा असे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
२ लाखांमध्ये लग्न अन् नवऱ्या मुलाच्या वडिलांचं अपहरण
या महिन्यातील 10 डिसेंबर रोजी वाशिम जिल्ह्याच्या रिसोड तालुक्यातील आसेगाव पेन गावातील दीपक सिताराम खानझोडे यांचा विवाह छत्रपती संभाजीनगर येथील राधा तुपे हिच्याशी झाला होता. या लग्नासाठी मध्यस्थामार्फत २ लाख रुपयांचा व्यवहार झाल्याचं समोर आलं आहे. विवाहानंतर नवरी पळून जाण्याच्या तयारीत असल्याचा संशय आल्याने दीपक खानझोडेसह त्याचं कुटुंबीय सतर्क झालं होतं. दरम्यान, 13 डिसेंबर रोजी नवरीकडचे 10 ते 12 जण चारचाकी वाहनातून आसेगाव पेन इथं आले होते. मात्र, नवरी घरात नसल्याचं लक्षात येताच आरोपींनी घरात घुसून तोडफोड केली आणि नवरदेवाचे वडील सिताराम खानझोडे यांचं अपहरण केलं.
मामाच्या घराची तोडफोड
यानंतर आरोपी नवरदेवाच्या मामाच्या घरी मोहजा इथं नवरीच्या शोधासाठी गेले असता तिथे ही नवरी न आढळल्यानं त्यांनी घरात घुसून धुडगूस घालत सामानाची मोठी नासधूस केली. त्यानंतर हे सर्व आरोपी सीताराम खानझोडे या अपहरण केलेल्या नावरदेवाच्या वडिलांना घेऊन जालन्याकडे जातांना त्यांनी वाशिमच्या लोणी गावाजवळ एका कारला अडवून त्याची तोडफोड करत चार जणांना जबर मारहाण करून त्यांच्या जवळची 15 हजार रुपये हिसकावून नेले होते.
या प्रकरणी खानझोडे कुटुंबीयांनी वाशिम पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली आणि तक्रार दाखल केली. यानंतर वाशिम पोलिसांनी अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर आणि जालना या तीन ठिकाणी एकाचवेळी धडक कारवाई केली. या कारवाईत अहिल्यानगर येथून अपहरण करण्यात आलेल्या सिताराम खानझोडे यांची सुखरूप सुटका केली. या प्रकरणी आरोपी राहुल दिलीप म्हस्के ( रा.नागेवाडी, जि. जालना), सतीश विनायक जाधव, (रा. जालना),
आकाश छगन गायकवाड (रा.जालना) एजंट शांताराम कडुजी खराटे (रा.मोहजा रोड) आणि नवरीला अटक करण्यात आली आहे.
या टोळीतील केवळ जेरबंद करण्यात आल्यानं राज्यातील अनेक दरोड्याचा तसंच लग्न लावून नवरी सह लाखोंचे दागिने घेऊन पसार होणाऱ्या अनेक गुन्ह्यांचा शोध लागण्याची शक्यता आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे.
