राजकारणातल्या ताणतणावातही ज्यांनी नेहमी संयम राखला, त्या शरद पवार यांच्यासाठी आजचा दिवस नियतीने अत्यंत क्रूर ठरवला. आपल्या लाडक्या पुतण्याच्या विमानाला भीषण अपघात झाल्याची बातमी जेव्हा पवार कुटुंबीयांना कळाली, तेव्हा मुंबईपासून दिल्लीपर्यंत केवळ आणि केवळ शोकमग्न शांतता आणि अश्रूंचे साम्राज्य पसरले होते.
शरद पवार कुठे होते?
संसदेच्या मागील अधिवेशनानंतर ज्येष्ठ नेते शरद पवार हे राजकीय आणि सार्वजनिक कार्यक्रमापासून दूर आहेत. वाढते वय, प्रकृतीच्या कारणास्तव शरद पवार हे मोजक्या कार्यक्रमाला उपस्थित असतात. अजित पवार यांच्या विमान अपघाताची बातमी समोर आली तेव्हा शरद पवार हे मुंबईतील आपल्या 'सिल्व्हर ओक' या निवासस्थानी होते. शरद पवार आणि संपूर्ण पवार कुटुंबासाठी हा मोठा धक्का आहे. शरद पवार यांना कुटुंबीयांनी ब्रीच कॅण्डी रुग्णालयात नेले.
advertisement
शरद पवार ब्रीच कॅण्डीमध्ये...
अजित पवारांच्या निधनाची बातमी समजताच त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांना ब्रीच कॅण्डी रुग्णालयात नेले. त्या ठिकाणी पवार यांची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर अजितदादांच्या निधनाची बातमी सांगण्यात आली. अजितदादांच्या निधनाचा धक्का शरद पवार यांना सहन झाला नाहीतर, या काळजीपोटी त्यांना रुग्णालयात नेण्यात आले होते. शरद पवार यांना सिल्वर ओकवर आणण्यात आले आहे. शरद पवार यांची प्रकृती पाहून त्यांना बारामतीमध्ये नेण्याबाबत निर्णय घेतला जाण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
तर, खासदार सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार या संसदेच्या अधिवेशनानिमित्ताने दिल्लीत आहेत. अपघाताची बातमी समजताच सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार या तातडीने पुण्यासाठी रवाना झाल्याची माहिती समोर आली आहे.
अजित पवार यांनी महाराष्ट्र सरकारमध्ये अनेक महत्त्वाची खाती सांभाळली आहेत. विशेषतः अर्थमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द लक्षवेधी राहिली. सलग अनेक अर्थसंकल्प सादर करण्याचा विक्रम त्यांच्या नावावर आहे. सिंचन, जलसंपदा, अर्थ आणि नियोजन यांसारख्या खात्यांमध्ये त्यांनी धाडसी निर्णय घेतले. काही निर्णयांवरून ते वादातही सापडले, मात्र प्रशासकीय पकड असलेला नेता म्हणून त्यांची प्रतिमा कायम राहिली.
