मेळघाटमधील काटकुंभ गावातील ग्रामस्थांशी लोकल18ने चर्चा केली. तेव्हा ते सांगतात की, आमच्या इथे मोबाईल नेटवर्क आणि लाईटची खूप मोठी समस्या आहे. गावात BSNL चे टावर आहे. मोबाईलमध्ये रेंज दाखवते. मात्र, कॉल लागत नाही. BSNL च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी आम्ही बोललो. पण, ते विविध कारणं सांगतात. कॉल कनेक्ट होत नसल्याने अनेक समस्यांना आम्हाला सामोरं जावं लागतं आहे.
advertisement
कॉल लागत नसल्याने गरोदर महिलांच्या जीवाशी खेळ
काटकुंभ या गावात प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. आजूबाजूच्या 8 ते 10 गावातील रुग्ण याठिकाणी आणले जातात. प्रत्येक 3 ते 4 किमी अंतरावर एक गाव आहे. काही गावं 15 ते 20 किमी देखील आहेत. त्या गावातून जर रुग्ण याठिकाणी आणायचा असेल तर अँब्युलन्स लागेल. अँब्युलन्स पाहिजे असल्यास कॉल कनेक्ट होणं महत्त्वाचं आहे. याठिकाणी नेटवर्क समस्या असल्याने कॉल लागत नाही. त्यामुळे रुग्ण वेळेत रुग्णालयात पोहोचू शकत नाही. गरोदर महिलांना हा त्रास खूप घातक आहे. कॉल लागत नसल्यास अनेकवेळा एका गावातून दुसऱ्या गावात जाऊन निरोप सांगावा लागतो. रस्ते व्यवस्थित नसल्याने जाण्यायेण्यात 1 तास जातो. इतका वेळ रुग्णांना उपचार मिळत नाही. त्यामुळे रुग्ण दगावण्याची भीती असते, असे ग्रामस्थ सांगतात.
विद्यार्थ्यांना अभ्यासात समस्या
मेळघाटमधील अनेक मुलं अमरावती किंवा इतर ठिकाणीच शिक्षणासाठी आहेत. मात्र, काहींना जाणं शक्य होत नाही. त्यांना जर गावात राहून अभ्यास करायचा असेल? एखादा फॉर्म ऑनलाईन करायचा असेल तर याठिकाणी नेटवर्कच राहत नाही. त्यासाठी पैसे खर्च करून शहरात जावं लागते. अनेकदा विद्यार्थ्यांना पर्याय नसल्याने शिक्षण देखील सोडावं लागतं आहे. शाळेतही इंटरनेट नसल्याने विद्यार्थी अनेक गोष्टींपासून वंचित आहेत, असेही ते सांगतात.