याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, ठाणे-घाटकोपर-वडाळा मेट्रो 4 लाईनचा दक्षिण मुंबईत पूर्व किनाऱ्यापर्यंत विस्तार करण्यासाठी मेट्रो 11 प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. सुरुवातीला हा मार्ग वडाळा-सीएसएमटीपर्यंत मर्यादित होता. मात्र, नव्या आराखड्यानुसार वडाळा-भायखळा- भेंडी बाजार-सीएसएमटीमार्गे थेट अपोलो बंदरापर्यंत भुयारी मेट्रो जाणार आहे. एकूण 16.83 किलोमीटर लांबीच्या प्रकल्पासाठी राज्य मंत्रिमंडळाने 23 हजार 487 कोटी 51 लाख रुपये मंजूर केले आहेत. आकडेवारी केल्यास, एका किलोमीटरसाठी 1,381 कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत.
advertisement
तज्ज्ञांच्या मते, भुयारी मेट्रोची निर्मिती खर्चिक असते. त्यामुळेच केवळ आवश्यकतेनुसारच या मेट्रो लाईन बांधल्या जातात. मेट्रोसाठी बोगदे खोदताना कट अँड कव्हर आणि न्यू ऑस्ट्रियन टनेलिंग मेथड (एनएटीएम) या दोन पद्धती वापरल्या जातात. शहरी भागात आजूबाजूच्या रचनांना धक्के बसू नयेत यासाठी एनएटीएम ही सर्वात सुरक्षित पद्धत मानली जाते. मात्र, यामुळे खर्च वाढण्याची शक्यता असते.
याच पद्धतीनुसार मुंबईतील आरे-जेव्हीएलआर बीकेसी-सिद्धिविनायक- आचार्य अत्रे चौक (वरळी नाका) हा मार्ग धरून तयार होत असलेली मेट्रो 3 ही देशातील सर्वाधिक लांबीची भुयारी मेट्रो आहे. मेट्रो 3साठी 23 हजार कोटींचा खर्च प्रस्तावित होता. विविध कारणांमुळे हा प्रकल्प लांबणीवर पडत गेला आणि प्रस्तावित खर्चही वाढत गेला. अखेरीस ही रक्कम 37 हजार 276 कोटींवर पोहोचली. या तुलनेत नियोजित मेट्रो 11 आणखी महाग ठरणार आहे.