छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड येथील एका दाम्पत्याला आपत्य झाले. मात्र, बाळ जन्मताच मोतीबिंदूने ग्रस्त होते. बालकाच्या आईने सांगितले की, “बाळ बारा दिवसांचे असताना त्याने डोळे उघडले. त्याच्या डोळ्यांमध्ये काहीतरी वेगळं दिसलं. त्यानंतर आम्ही डॉक्टरांकडे गेलो. डॉक्टरांनी मोतीबिंदू असल्याचं सांगून हैदराबाद येथे उपचार घेण्याचा सल्ला दिला. परंतु, तिथल्या उपचारांचा खर्च खूप मोठा होता.”
advertisement
त्यानंतर हे दाम्पत्य घाटी रुग्णालयात आले. येथे बालकाची तपासणी डॉक्टर वैशाली लोखंडे-उणे आणि डॉक्टर अर्चना वरे यांनी केली. त्यांनी सांगितले की, शस्त्रक्रियेमुळे बाळाला दिसू लागेल. या माहितीनंतर बालकावर शस्त्रक्रिया करण्यात आली, ज्यामुळे आठ महिन्यांनी बाळाने आपल्या आईला पहिले. “हा माझ्या जीवनातील सर्वात आनंदाचा क्षण आहे,” असे त्या बाळाच्या आईने सांगितले.
डॉक्टर वैशाली लोखंडे-उणे म्हणाल्या, “आठ महिन्यांच्या बाळावर शस्त्रक्रिया करणे मोठ्या धाडसाचे आणि जोखमीचे काम आहे. मात्र, आमच्या टीमने काळजीपूर्वक ती यशस्वीरीत्या पार पाडली. हे आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे.”
ही शस्त्रक्रिया योजनेअंतर्गत मोफत झाली असून, ऑपरेशननंतर लागणारी औषधेही मोफत पुरवण्यात आली आहेत. नेत्ररोग विभाग प्रमुख डॉक्टर अर्चना वरे यांनीही अभिमान व्यक्त करत सांगितले की, “आमच्या टीमने केलेले हे कार्य अतिशय कौतुकास्पद आहे.”





