वाल्मिक कराडची पोलीस कोठडी संपल्याने त्याला केज न्यायालयासमोर हजर करण्यात आले. सरकारी वकिलांनी खंडणी प्रकरणात आणखी चौकशी करायची आहे असे सांगून त्याच्या पोलीस कोठडीची मागणी केली परंतु न्यायालयाने मागणी फेटाळून लावत वाल्मिकला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. दुसरीकडे संतोष देशमुख यांच्या हत्येची चौकशी करणारे विशेष चौकशी पथकाने आणि गुन्हे अन्वेषण विभागाने वाल्मिकवर हत्येचा कटाचा ठपका ठेवून त्याच्या चौकशीकरिता सीआयडी कोठडी मागितली. तसेच राज्य सरकारनेही मकोका अंतर्गत कारवाईचे पाऊल उचलल्याने कराडला मोठा झटका बसलेला आहे.
advertisement
सरकारी वकिलांनी काय सांगितलं?
खंडणी प्रकरणात न्यायालयाने वाल्मिकला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी दिली. परंतु त्याचवेळी एसआयटीने हत्येच्या कटात सहभागी असल्याचा ठपका ठेवून त्याप्रकरणी चौकशी करायची आहे, असे सांगून कोठडीची मागणी केली आहे. वाल्मिक कराड याच्यावर 302 च्या गुन्ह्यात मकोकाअंतर्गत कारवाई करण्यात आल्याची माहिती सरकारी वकील जे. बी. शिंदे यांनी दिली.
वाल्मिक कराडची आता हत्या प्रकरणात चौकशी होणार
वाल्मिक कराड याच्यावर हत्येचा कट रचल्याचा ठपका ठेवत सीआयडीने आणि विशेष पोलीस पथकाने न्यायालयाकडे कोठडी मागितली. खुनाच्या कटात वाल्मिकचा सहभाग आहे, असे एसआयटीने न्यायालयाला सांगितले. तसेच खून प्रकरणातील इतरही आठ आरोपींवर आधीच मकोका लागलेला होता. आता वाल्मिक कराड याच्यावरही मकोका लागल्याने आणि हत्येचा कट रचल्याचा आरोप असल्याने वाल्मिक कराडची आता खून प्रकरणात चौकशी होणार आहे.
परळीत कराडचे समर्थक आक्रमक
वाल्मिक कराड याच्यावर मकोका आणि खुनाचा गुन्ह्या दाखल झाल्याने परळीत वाल्मिक कराड याचे समर्थक चांगलेच आक्रमक झाले आहेत. त्यांनी परळी बंदची हाक दिलेली आहे. केजमधून जशी कराडवर मकोका लागल्याची बातमी आली, तसे परळीच्या चौकाचौकातील दुकाने बंद करण्यात आली.