धारूर तालुक्यातील भोगलवाडी येथील रहिवासी विठ्ठल किसन मुंडे यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याने 28 नोव्हेंबर रोजी बीड येथील शिवाजी हार्टकेअर सेंटरमध्ये दाखल करण्यात आले होते. तपासणीनंतर दुसऱ्या दिवशी करण्यात आलेल्या अँजिओग्राफीमध्ये त्यांच्या हृदयातील तीन रक्तवाहिन्यांमध्ये अडथळे असल्याचे निदान झाले. त्यानंतर डॉक्टरांनी तातडीने अँजिओप्लास्टी करण्याचा सल्ला दिला आणि ही शस्त्रक्रिया ‘आयुष्मान भारत’ योजनेअंतर्गत करण्यात आल्याचे नातेवाइकांचे म्हणणे आहे.
advertisement
Beed News: उधारीवर कपडे दिले नाहीत, चौघांनी दुकानदाराला…, बीडमध्ये खळबळ
नातेवाइकांच्या आरोपानुसार, योजना लागू असतानाही रुग्णालय प्रशासनाने उपचारासाठी अतिरिक्त रक्कम मागितली. रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या फोन-पे खात्यावर वेगवेगळ्या टप्प्यांत एकूण 1 लाख 85 हजार रुपये घेतल्याचा आरोप रुग्णाचे भाऊ बळीराम मुंडे यांनी केला आहे. यामध्ये रोख 40 हजार रुपये तसेच डिजिटल व्यवहारातून मोठी रक्कम घेतल्याचे नमूद करण्यात आले आहे. या प्रकारामुळे आर्थिक शोषण झाल्याचा दावा नातेवाइकांनी केला आहे.
1 डिसेंबर रोजी विठ्ठल मुंडे यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. मात्र, प्रकृती पूर्णपणे स्थिर नसतानाही घाईघाईने सुट्टी दिल्याचा आरोप नातेवाइकांनी केला आहे. घरी परतल्यानंतर अवघ्या तीन दिवसांत, 4 डिसेंबर रोजी पहाटे झोपेतच त्यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर नातेवाइकांनी संबंधित डॉक्टरांकडे जाब विचारला असता समाधानकारक उत्तरे मिळाली नसल्याचेही त्यांनी तक्रारीत नमूद केले आहे.
या प्रकरणाची गंभीर दखल घेत जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक आणि जिल्हा शल्यचिकित्सकांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय राऊत यांनी तक्रार प्राप्त झाल्याची पुष्टी करत चौकशी समिती नेमली जाईल आणि अहवालात दोषी आढळल्यास कठोर कारवाई केली जाईल, असे सांगितले आहे. दरम्यान, संबंधित रुग्णालयाचे प्रमुख डॉ. अरुण बडे यांनी आरोप फेटाळून लावत आमच्याकडून योग्य उपचार झाले असून तक्रारीत तथ्य नसल्याचा दावा केला आहे. या प्रकरणाच्या चौकशीकडे आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.






