नेमकी घटना काय?
6 डिसेंबर रोजी दीपेवडगाव येथील हनुमान मंदिरात एक विवाह झाला. मध्यस्थी सतीश प्रल्हाद गुळभिले याने नागेश जगताप यांना प्रीती शिवाजी राऊत हिच्यासोबत लग्न लावून देण्याचे आश्वासन दिले होते. ठरल्याप्रमाणे मंदिरात विवाहसोहळा पार पडला आणि वधू-वरांसह नातेवाईक कोद्रीला पोहोचले. सगळं सुरळीत असल्याचं चित्र असताना दुपारनंतर अचानक नवरीच्या हालचाली संशयास्पद बनल्या.
advertisement
पालकांनो सावधान! 12 महिन्याच्या बाळानं जेली बॉल गिळला, आतड्यात फुगला अन् पुढे जे घडलं...
सायंकाळी साडेचारच्या सुमारास प्रीती राऊत हिने ‘शौचाला जाते’ असा बहाणा केला आणि घरातून हळूच पसार होऊ लागली. काही ग्रामस्थांना तिची घाईघाईची वाटचाल संशयास्पद वाटली. त्यांनी तिच्या हालचालींवर लक्ष ठेवले आणि डिघोळअंबा बसस्थानकाजवळ तिला पकडले. चौकशीदरम्यान तिच्या उत्तरांत विसंगती दिसताच संपूर्ण घटना धुंडाळली गेली आणि हा बनावट विवाहाचा डाव असल्याचे स्पष्ट झाले.
नागेश जगताप आणि नातेवाईकांनी युसूफवडगाव पोलिस ठाण्यात धाव घेतली. तपासादरम्यान नवरीच्या मावशी सविता आणि माया राऊत यांचेही या फसवणुकीतील सहभागाचे धागेदोरे समोर आले. एजंट गुळभिले याने संगनमत करून कोणतेही वैधानिक कागदपत्र तपासल्याशिवाय विवाहाची व्यवस्था केल्याचे उघड झाले. बनावट नोटरी, तसेच लग्नाआधी पतीच्या नावावर बनावट आधार कार्ड तयार करण्याचाही संशय पोलिसांना आहे.
पोलिसांनी प्रीती राऊत, तिच्या दोन नातेवाईक महिला आणि एजंट गुळभिले यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. प्रीतीला न्यायालयात हजर केले असता तिला 10 डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक भीमराव मांजरे करत असून, बनावट कागदपत्र तयार करणाऱ्या नोटरीधारक आणि संगणक तंत्रज्ञाचीही चौकशी सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात बनावट विवाह रॅकेटबद्दल नवीन चर्चा रंगू लागल्या असून यामागची साखळी उघड करण्याची मागणी होत आहे.






