रक्षाबंधनाचा आदल्या दिवशी बीड पोलिसांनी आठ वर्षांपासून बेपत्ता असलेल्या मुलाची आणि त्याच्या आईवडिलांची भेट घालून दिली. राजू असं या मुलाचं नाव असून तो आठ वर्षांपूर्वी आईवडिलांपासून दुरावला होता. आठ वर्षांनंतर आपल्या आईला कडाडून मिठी मारताना राजू प्रचंड भावूक झाला होता. मायलेकरांची ही भावनिक भेट बघून उपस्थित पोलीस अधिकाऱ्यांच्याही अश्रूंचा बांध फुटला.
advertisement
Tapovan: समाजानं नाकारलं पण तपोवनाने स्विकारलं, शेकडो रुग्णांना मिळतोय रोजगार
या प्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार, काकासाहेब माळी आणि त्यांची पत्नी हे मागील कित्येक वर्षापासून ऊसतोड मजूर म्हणून काम करतात. आर्थिक परिस्थिती बेताची असल्यामुळे त्यांचा मुलगा राजू हा शिक्षकांच्या घरी राहत होता. 2016 मध्ये शाळेत असताना 16 वर्षांचा राजू कुणाला काहीही न सांगता निघून गेला होता. एक-दोन दिवसांत मुलगा परत येईल, या आशेवर या दाम्पत्याने वाट पाहिली. पण, राजू पुन्हा परतलाच नाही. वर्षभराचा कालावधी उलटूनही राजू परत आला नाही. आपल्या मुलाचा काहीतरी घातपात झाला अन् तो मरण पावला असावा, अशी माळी दाम्पत्याने स्वतःची समजूत घातली होती.
मनाची कितीही समजूत घातली तरी माळी दाम्पत्याला राजूची सतत आठवण येत होती. शेवटी 2023 मध्ये त्यांनी राजू बेपत्ता असल्याची पोलीस तक्रार दिली. पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली. त्याच्या शोधासाठी विशेष पथकाची नेमणूक केली. तांत्रिक बाबींची तपासणी केली असता राजू पुण्यात असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर बीड पोलीस राजूला बीड येथे घेऊन आले आणि त्याला त्याच्या आईवडिलांच्या स्वाधीन केलं. या कामगिरीमुळे बीड पोलिसांची मान उंचावली आहे.





