मिळालेल्या माहितीनुसार, मागील अडीच वर्षांपासून सासरच्या मंडळींकडून भक्तीला विविध कारणांवरून त्रास दिला जात होता. घरात तीन मुली झाल्याने तिच्यावर सतत टीका केली जात होती. तसेच पतीला दुसरे लग्न करता यावे यासाठी तिने संमती द्यावी, यासाठी तिच्यावर दबाव टाकण्यात येत होता. यासोबतच वारंवार मारहाण करून बाँड पेपरवर लिहून देण्याची सक्तीही करण्यात येत असल्याचा आरोप आहे.
advertisement
‘तो’ काळ बनून आला, पण चिमुकलीनं डेअरिंग केलं, नराधमाच्या तावडीतून मैत्रिणीला वाचवलं, कसं?
या सततच्या छळामुळे मानसिकदृष्ट्या खचलेल्या भक्तीने 2 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळच्या सुमारास राहत्या घरी किटकनाशक प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. प्रकृती बिघडल्याने तिला तातडीने बीड येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर पुढील उपचारासाठी तिला खासगी रुग्णालयात हलविण्यात आले होते.
काही दिवस उपचार सुरू असल्यानंतर तिची प्रकृती अधिक गंभीर झाल्याने तिला पुन्हा सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान तिची प्रकृती सुधारू शकली नाही आणि अखेर 6 मार्च रोजी तिचा मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, मृत विवाहितेची आई गंगूबाई प्रभू ठोकळ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पती अमोल अर्जुन कोरडे, सासरे अर्जुन साधू कोरडे आणि सासू आशाबाई अर्जुन कोरडे यांच्याविरोधात पिंपळनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक अर्जुन घोलवाल करत आहेत.






