बिबट्याच्या हल्ल्यात वाळूजमधील खंडोबा वस्ती परिसरात राहणाऱ्या योगिता खाडे (वय 29) जखमी झाल्या आहेत. रविवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास योगिता खाडे घरासमोर वाळत टाकलेले कपडे काढत होत्या. त्याच वेळी मक्याच्या शेतातून अचानक बाहेर आलेल्या बिबट्याने त्यांच्या दिशेने झेप घेत हल्ला चढविला. या धक्कादायक हल्ल्यात बिबट्याने त्यांच्या हातातील कपड्यांना पकडून तब्बल 50 फूट अंतरापर्यंत त्यांना फरफटत नेले.
advertisement
घटनेच्या वेळी घरातील अन्य सदस्यांनी आरडाओरड केल्याने बिबट्याने त्यांना सोडून पुन्हा शेतात पलायन केले. सुदैवाने योगिता खाडे यांना किरकोळ दुखापत झाली असून स्थानिकांनी त्यांना तत्काळ सुरक्षित ठिकाणी हलवले. घटनेची माहिती मिळताच वनविभागाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेऊन ठसे आणि परिस्थितीचा तपास सुरू केला आहे.
या हल्ल्यामुळे परिसरात पुन्हा एकदा भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे, पाच वर्षांपूर्वी 29 नोव्हेंबर 2020 रोजी पारगाव जोगेश्वरी येथे बिबट्याच्या हल्ल्यात सुरेखा बळे या महिलेचा मृत्यू झाला होता. वाळूजपासून अवघ्या दोन किलोमीटर अंतरावर घडलेली ती घटना अजूनही लोकांच्या स्मरणात असताना, नेमक्या पाच वर्षांनी पुन्हा अशीच घटना घडल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण आहे.
वाळूज परिसरात वाढलेल्या वन्य प्राण्यांच्या हालचालींमुळे गावकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. स्थानिकांनी वनविभागाने तातडीने उपाययोजना करून बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी केली आहे. दरम्यान, वनविभागाने रहिवाशांना सावध राहण्याचे आवाहन केले असून परिसरात पाळत ठेवण्यासाठी अतिरिक्त पथक तैनात करण्यात आल्याची माहिती आहे.






