रेल्वे प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, मध्य रेल्वेवरील मुंबई विभागातील रेल्वे रूळ, सिग्नल यंत्रणा, ओव्हर हेड वायरची देखभाल-दुरूस्ती करण्यासाठी रविवारी मध्य रेल्वेवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉकमुळे चिंचपोकळी आणि करी रोड रेल्वे स्टेशन्सचा थांबा देखील रद्द करण्यात येणार आहे. त्यामुळे लालबागचा राजा, चिंचपोकळीचा चिंतामणी, करी रोड परिसरातील गणपती दर्शनाला जाणाऱ्या गणेशभक्तांचे प्रचंड हाल होण्याची शक्यता आहे. पश्चिम रेल्वेवर शनिवारी ब्लॉक घेण्यात आल्याने, रविवारी दिवसा कोणताही ब्लॉक नसेल.
advertisement
Mumbai News: गणेशोत्सवासाठी मध्य रेल्वेची खास यंत्रणा, गर्दी नियंत्रणासाठी काय आहे प्लॅन?
लालबागचा राजा आणि चिंचपोकळीचा चिंतामणीच्या दर्शनाला जाण्यासाठी गणेशभक्त करी रोड आणि चिंचपोकळी स्टेशन्सवर उतरतात. अशातच रविवारी सुट्टीचा दिवस असल्याने गणपतीच्या दर्शनाला जाणाऱ्यांची संख्या जास्त असणार आहे. पण, रविवारी ब्लॉक असल्याने या दोन्ही स्टेशन्सवर लोकल थांबणार नाहीत. त्यामुळे भाविकांना दादर आणि परळ स्टेशनवर उतरून पुढे प्रवास करावा लागणार आहे. गणेशोत्सवाच्या काळात मध्य रेल्वेने घेतलेल्या या निर्णयामुळे गणेशभक्तांमधून नाराजी व्यक्त होत आहे.
सेंट्रल लाईनच्या ब्लॉकचं वेळापत्रक
रविवारी सकाळी 10 वाजून 55 मिनिटांपासून ते 3 वाजून 55 मिनिटांपर्यंत सीएसएमटी ते विद्याविहार दरम्यान अप आणि डाऊन धिम्या मार्गावर ब्लॉक असेल.
हार्बर लाईनच्या ब्लॉकचं वेळापत्रक
रविवारी सकाळी 11 वाजून 10 मिनिटांपासून ते 4 वाजून 10 मिनिटांपर्यंत कुर्ला आणि वाशी दरम्यान अप आणि डाऊन मार्गावर ब्लॉक असेल.
वेस्टर्न लाईनच्या ब्लॉकचं वेळापत्रक
शनिवारी रात्री 12 वाजून 30 मिनिटांपासून ते पहाटे 4 वाजेपर्यंत मुंबई सेंट्रलवर ब्लॉक असेल. वेस्टर्न लाईनवर रविवारी दिवसा कोणत्याही प्रकारचा ब्लॉक नसेल.