दक्षिण मध्य रेल्वे विभागांतर्गत येणाऱ्या या 177.79 किमी लांबीच्या मार्गासाठी केंद्राने 1 ऑगस्ट 2025 रोजी तब्बल 2 हजार 179 कोटी रुपये मंजूर केले. पुढच्या टप्प्यात या मार्गात संपादित होणाऱ्या जमिनीसाठी 21 ऑक्टोबर रोजी अधिसूचना निघाली आहे. जालना उपविभागातील बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांकडून 21 नोव्हेंबरपर्यंत हरकती, सूचना व आक्षेप मागवण्यात आले आहेत. यानंतर सुनावणी, जमीन मोजणी, संपादन, मावेजा अदा केला जाईल. दुसरीकडे कामाच्या निविदा होऊन कार्यारंभ आदेश दिले जातील, असे सूत्रांकडून सांगण्यात आले.
advertisement
पुणे ते छत्रपती संभाजीनगर अवघ्या 3 तासांत, गेमचेंजर प्लॅन तयार, पहिल्या टप्प्याचं काम सुरू
मराठवाड्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण असलेल्या बहुप्रतीक्षित मनमाड-नांदेड रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण व विद्युतीकरण पूर्ण झाल्यास या भागाच्या विकासाला चालना मिळेल. यादृष्टीने लोकप्रतिनिधी व रेल्वे प्रशासनाकडून वर्षानुवर्षे सातत्यपूर्ण पाठपुरावा केल्यामुळे हा विषय प्राधान्यक्रमावर आला. यानुसार केंद्राकडून मंजुरी मिळाल्यानंतर ही कामे हाती घेण्यात आली आहेत. यात छत्रपती संभाजीनगर ते परभणीपर्यंतच्या मार्गाचे दुहेरीकरणासाठी तीन महिन्यांपूर्वी निधीची तरतूद झाल्यावर जमीन संपादन व तत्सम बाबींना वेग आला आहे.
या गावांतील जमीन संपादित होणार
जालना शहर व तालुक्यातील दरेगाव, हिस्वन बु., कारला, लोंढ्याची वाडी, माळीपिंपळगाव, ममदाबाद, पाचनवडगाव, रोहनवाडी, बदनापूर व तालुक्यातील दावलवाडी, मात्रेवाडी, रामखेडा, शेलगाव, वरुडी, गोकुळवाडी या 16 गावांमधील अंदाजे 20 हेक्टर 26 आर क्षेत्र दुहेरीकरणासाठी संपादित केले जाणार आहे. परतूर उपविभागातील आनंदवाडी, परतूर, खांडवी, उस्मानपूर, रायपूर, सातोना खु., सिरसगाव, मसला गावातील अंदाजे 7 हेक्टर जमिनीचे संपादन केले जाणार आहे.
दुहेरीकरण झाल्यास छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली व नांदेड या जिल्ह्यांनाही फायदा होणार आहे. मालगाड्यांसाठी स्वतंत्र ट्रॅक असल्याने शेतमाल आणि औद्योगिक माल वाहतुकीत मोठी क्रांती घडेल.
संयुक्त मोजणी अहवाल मागवला
प्राथमिक अधिसूचनेनुसार रेल्वे रुळाच्या दुहेरीकरणासाठी जालना उपविभागातील ज्या गावातील जमीन संपादित होणार आहे, त्याचा संयुक्त मोजणी अहवाल त्या-त्या यंत्रणांकडून मागवण्यात आला आहे. हा अहवाल रेल्वे प्रशासनाला पाठवल्यावर अंतिम अधिसूचना निघून संपादित क्षेत्र व दर निश्चित होतील. त्यानंतर निवाडे होऊन बाधितांना मोबदला अदा केला जाईल. रेल्वे रुळालगतची मोजणी असल्यामुळे हे काम लवकर होईल, असे उपविभागीय अधिकारी रामदास दौंड यांनी सांगितले.
दरम्यान, नागपूर-मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉरसारख्या मोठ्या औद्योगिक संकल्पनांना या मार्गाचा मोठा फायदा होईल. शिवाय, लॉजिस्टिक्स पार्क, कोल्ड स्टोअरेज, गोदामे आणि नवीन उद्योगांना चालना मिळणार आहे.






