आम्हाला शोधू नका..., आईवडिलांचा वाद अन् मुलांचं टोकाचं पाऊल, संभाजीनगरच्या घटनेनं पोलीसही चक्रावले!
- Reported by:Apurva Pradip Talnikar
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Chhatrapati Sambhajiangar: शोध घेताना कुटुंबीयांना घरातील टेबलावर 'आम्हाला शोधू नका, आम्ही परत येणार नाही', असे लिहिलेली चिठ्ठी सापडली होती.
छत्रपती संभाजीनगर: आई-वडिलांचे संबंध सामान्य नसलेल्या घरातली मुलं खूप अस्वस्थ, केविलवाणी होऊन जातात. मुलांच्या कोवळ्या वयात त्यांना आई-वडिलांची भावनिक जवळीक, त्यांची माया, भरपूर वेळ आणि घरामधले आनंदी वातावरण एवढंच हवे असते. आणि असं झालं नाही तर यातून मुलं टोकाचे पाऊल देखील उचलू शकतात. अशीच एक घटना संभाजीनगर जिल्ह्यात देखील घडली आहे.
आई-वडिलांच्या सततच्या वादामुळे दोन भावंडे घरातून पळून गेले. या सख्ख्या भावंडांना शोधण्यात पोलिसांना साडेचार महिन्यांनंतर यश मिळाले आहे. ऑपरेशन मुस्कानअंतर्गत ही शोधमोहीम राबविण्यात आली. ही घटना गंगापूर तालुक्यातील एका गावात घडली होती. पोलिसांनी दोन्ही भावंडांना बुधवारी (दि.28) पालकांच्या स्वाधीन केले.
advertisement
आम्हाला शोधू नका...
गंगापूर तालुक्यातील एका गावात शेतवस्तीवर राहत असलेल्या एका कुटुंबातील 16 वर्षीय मोठा मुलगा यश (नाव बदललेले आहे) हा जवळच्या गावातील एका शाळेत दहावीमध्ये शिकतो, तर दुसरा 13 वर्षीय मुलगा अर्णव (नाव बदललेले आहे) हा दुसऱ्या शाळेत सातव्या इयत्तेत शिकतो. 12 सप्टेंबर रोजी सायंकाळी ते शाळेतून घरी परतलेच नाहीत. याप्रकरणी 13 सप्टेंबर रोजी पालकांनी हरवल्याची फिर्याद गंगापूर ठाण्यात दिली होती. मुलांचा शोध घेताना कुटुंबीयांना घरातील टेबलावर 'आम्हाला शोधू नका, आम्ही परत येणार नाही', असे लिहिलेली चिठ्ठी सापडली होती. शोध घेऊनही गंगापूर पोलिसांना मुलांचा शोध लागत नव्हता.
advertisement
दरम्यान, या गुन्ह्याचा समांतर तपास करीत असताना अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक शाखेच्या सपोनि. सरला गाडेकर यांना खबऱ्यामार्फत लहान मुलगा हा अहिल्यानगर येथे असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने अहिल्यानगर जिल्ह्यातील दहिगाव येथे जाऊन त्या मुलाला ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशीअंती मोठा भाऊ मुंबईत असल्याचे त्याने सांगितले. यावरून पथकाने मुंबईतील मच्छी बंदर, कुलाबा येथून दुसऱ्या मुलालादेखील बुधवारी (दि.28) शोधून ताब्यात घेतले.
advertisement
आई-वडिलांत सतत वाद
दोन्ही मुलांना पोलिसांनी विचारपूस केली असता, आई-वडिलांमध्ये सतत वाद होत असल्याने कौटुंबिक वातावरण अस्थिर होते. या त्रासाला कंटाळून त्यांनी घर सोडून पलायन केल्याचे सांगितले. पथकाने दोन्ही मुलांना गंगापूर पोलिसांच्या मदतीने पालकांच्या स्वाधीन केले.
ग्रामीणचे पोलिस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली 20 जानेवारी ते 20 फेब्रुवारीदरम्यान छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलिस दलामार्फत 'ऑपरेशन मुस्कान-14' ही हरविलेल्या तसेच पळवून नेण्यात आलेल्या बालकांच्या व व्यक्तींच्या शोधासाठी विशेष मोहीम राबविण्यात येत आहे.
advertisement
अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक शाखेच्या पोलिसांनी दोन भावंडांना शोधले. ही कारवाई सपोनि. सरला गाडेकर, पोउपनि. स्वप्निल नरवडे, विनोद भालेराव, गंगापूर ठाण्याचे पोउपनि. औदुंबर म्हस्के, पोअं. दिलीप साळवे, कपिल बनकर, इर्शाद पठाण, सपना चरांडे, मनीषा साळवे, भाग्यश्री चव्हाण यांच्या पथकाने केली.
Location :
Aurangabad,Maharashtra
First Published :
Jan 30, 2026 12:46 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
आम्हाला शोधू नका..., आईवडिलांचा वाद अन् मुलांचं टोकाचं पाऊल, संभाजीनगरच्या घटनेनं पोलीसही चक्रावले!








